
जातीय तेढ वाढवून प्रश्न सुटतील का?-अजित पवार
शिर्डी : जातीय तेढ वाढवून पोटापाण्याचे आणि रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत का, याचे आत्मचिंतन ते करणार आहेत का, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवारी) शिर्डी दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेवर हल्ला चढविला.पवार यांच्या हस्ते येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावरील टीकेबरोबरच पोलिस दलाला खडे बोल सुनावत शिर्डीच्या विकासाचा आराखडा मांडला.
त्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन चहापान, शेतीवाडीच्या गप्पा आणि कुटुंबीयांसोबत फोटोसेशनदेखील केले.आज सकाळी आठच्या सुमारास त्यांचे विमानाने येथे आगमन झाले. साईदर्शन आटोपून त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष संग्राम कोते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तेथे चहापान व नाश्ता घेतला. अॅड. शिवाजीराव कोते यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून ते साईसंस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके यांच्या वस्तीवर गेले. त्यांचे वडील (कै.) गणपतराव शेळके हे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे वर्गमित्र. त्यांच्या आठवणींना पवार यांनी या भेटीत उजाळा दिला.
ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे जितेंद्र शेळके, अमोल शेळके, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, उद्योजक धनंजय शेळके, विलास शेळके व संजय शेळके यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीत त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ व साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे होते. या दोन्ही कुटुंबीयांसमवेत पवार यांनी फोटोसेशन केले. त्यानंतर पोलिस वसाहत इमारतीच्या उद्घाटन समारंभाकडे ते रवाना झाले.
या कार्यक्रमात बोलताना पोलिसांना उद्देशून ते म्हणाले, की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना खाली मान घालावी लागेल असे वागू नका. काही बहाद्दर अधिकारी पत्रे पाठवतात. त्यांनी गृहमंत्री अथवा तेथील पालकमंत्र्यांसोबत बोलले पाहिजे. कनिष्ठांचे मनोबल टिकविण्याची काळजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घ्यावी. नांदेडसारख्या घटना घडल्यानंतर, महाराष्ट्राचा बिहार तर होत नाही ना अशी चर्चा सुरू होते, हे लक्षात घ्या. लोकप्रतिनिधी पोलिस दलाबाबत विधिमंडळात आपल्या संतप्त भावना व्यक्त करतात. त्यावेळी विधिमंडळात गृहमंत्री तुमची बाजू घेतात, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत त्यांनी खडे बोल सुनावले. तसेच चांगल्या कामाचे कौतुकही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी बळ दे, अशी प्रार्थना साईचरणी केली. येथील विमानतळाच्या विकासाबरोबरच शिर्डीचाही विकास होईल.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
Web Title: Ajit Pawar Question To Raj Thackeray Will The Problem Be Solved By Widening The Racial Divide Shirdi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..