अकोल्यात पिचड पडले एकाकी, डॉक्टरांची डोकेदुखी वाढणार; भांगरे पर्वाचा उदय

In Akola, Pichad was defeated by the NCP alone
In Akola, Pichad was defeated by the NCP alone

अकोले: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाआघाडीची सत्ता जिल्हा बँकेत आणली. 17 पैकी 12 जागा पटकावल्या. 

चार जागांसाठी निवडणूक लागली आहे. मात्र, यामध्ये अकोले तालुक्यात माजी आमदार वैभव पिचड यांची राज्यातील, जिल्ह्यातील दिग्गजांनी खेळी करीत राजकीय कोंडी करून त्यांना जिल्हा बँकेत येण्यापासून रोखले आहे. मात्र, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांना आपल्याकडे ओढत त्यांना बिनविरोध केल्याने तालुक्यातील राजकीय गणिते येणाऱ्या काळात बदलत जातील, यात मात्र शंका नाही.

लहामटे यांची डोकेदुखी वाढणार

राष्ट्रवादीचे अमित भांगरे यांची अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून बिनविरोध निवड झाल्याने भांगरे यांची तिसरी पिढी राजकारणात आली आहे. शेंडी येथील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत अशोक भांगरे यांनी आपला मुलगा अमित यास राजकारणात, समाजकारणात येण्याचे सूतोवाच केले होते. काही दिवसांतच जिल्हा बँकेत त्यांना बिनविरोध संचालक बनवले. भविष्यात त्यांना आमदारकीच्या स्पर्धेत उतरविल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास यापुढील काळात आमदार डॉ. किरण लहामटे यांना डोकेदुखी ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सीताराम गायकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने माजी आमदार वैभव पिचड यांनाही अडचण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अगस्ती कारखाना निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या समन्वय समितीने झारीतील शुक्राचार्य बाहेर काढणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गावात जाऊन पिचड, गायकर व संचालकांवर आरोप करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष दशरथ सावंत, राष्ट्रवादीचे सुरेश गडाख यांनी मंत्री अजित पवार यांचे आदेशावरून जिल्हा बँकेत सीताराम गायकर यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतली. त्यांना कोणत्या कारणातून बिनविरोध केले, याबद्दल तालुक्यात चर्चा आहे.

गायकर यांनी पुढील काळात राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला तर समन्वय समिती कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ते राष्ट्रवादीत येणार असल्याच्या चर्चेचे फड रंगत आहेत. एकंदरीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीने माजी आमदार पिचड यांना एका पाऊल मागे सारले. भांगरे यांच्या नव्या पिढीला संधी मिळाली.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com