धक्कादायक! शिवसेना नेता पॉझिटिव्ह असल्याने पडलाय वाळीत?; व्हिडीओद्‌वारे खंत

शांताराम काळे
Tuesday, 21 July 2020

कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून गाडीला भोंगा लावून अकोले शहर परिसरात फिरलो. बाहेरून आलेल्या व्यक्तीला कोरोना असल्याने त्याचा संपर्क गावाशी येऊ नये म्हणून त्यांना शाळेत संस्थात्मक क्वारंटाईनं केले.

अकोले (अहमदनगर) : कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून गाडीला भोंगा लावून अकोले शहर परिसरात फिरलो. बाहेरून आलेल्या व्यक्तीला कोरोना असल्याने त्याचा संपर्क गावाशी येऊ नये म्हणून त्यांना शाळेत संस्थात्मक क्वारंटाईनं केले. त्यावेळी मला कोरोनाची बाधा झाली. मात्र मी आज कोरोनाशी लढतोय. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, मात्र समाजातील माणसे मला भाऊ, दादा, मामा म्हणून जी कामे करून घेत होती. ती आज माझ्यावर व कुटुंबावर बहिष्कार टाकत आहेत. हे मनाला अतिशय दुःख देणारी घटना असून मी हे कधीच विसरू शकणार नाही.

कोरोना तर जाईल मात्र माणुसकी सोडू नका? काल मी तुमच्यातील होतो मग आज का दुरावलो,  अशी व्यथा कोरोनाबाधित शिवसेना कार्यकर्ते नितीन नाईकवाडी यांनी केली आहे. याबाबत सोशल मीडियावरही त्यांनी अन्यायाबाबत दाद मागितली आहे. मी नितीन नाईकवाडी शिवसेना शहराध्यक्ष अकोले चार दिवसांपासून कोरोनाने ग्रस्त असून खानापूर येथील दवाखान्यात उपचार घेत आहे. या चार दिवसात मला खूप चांगले आणि वाईट अनुभव आले. जोपर्यंत मी कोरोनाने ग्रस्त नव्हतो. तोपर्यंत अनेक लोकांनी नितीन मामा, नितीन भाऊ असे करून स्वतःची काम करून घेतली. रस्त्यावर ओळख दिली. मात्र आज मला खऱ्या अर्थाने तुमच्या सहाय्याची गरज असताना मला जे तुम्ही दूर लोटलं ते योग्य नाही. माझा हा आरोप नसून कळकळीची विनंती आहे.  कृपया असे करू नका. कालपर्यंत माझे घर सुरळीत सुरु होते. परंतु मी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर माझ्या घरच्या व्यक्तींना देखील काही कर्मचारी यांनी धमकी वजा सूचना केली. घराच्या बाहेर पडलात तर पकडून घेऊन जाऊ. जेव्हा हे मला माझ्या घरच्या व्यक्तींकडून कळाले तेव्हा अतिशय वाईट वाटले. एकीकडे तालुक्याचे तहसीलदार इतक्या चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत. कोरोना विषयक उपाययोजना करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला कर्मचारी असे वागत असतील तर त्यांनी असे करायला नको आहे.

आज सकाळी देखील घरातील पीठ संपल्यामुळे मी मित्रांना दळण दळून आणून द्या अशी कॉलवरून विनंती केली. परंतु यात काहींनी नकार दिला. नंतर जो मित्र तयार झाला त्याने ते दळण गिरणीत नेले. मात्र तेथे गिरणीचालकाने आमच्या घरातील दळण दळण्यास नकार दिला. परत माझ्या घरातील दळण आणू नका, असे बजावून परत पाठवले. इतकेच नाही तर माझ्या घरी गाई आहेत. त्यांचे 10 ते 15 लिटर दुध संकलन केंद्रात घालत असतो. परंतु संकलन केंद्रात देखील माझ्या घरचे दूध आणू नका, असे दूध पोहच करण्याऱ्या माझ्या मित्रास सांगण्यात आले. तसेच माझ्या घरी किरणा पोच करायचा होता. त्यावेळी माझ्याच मित्राने तो पोच न केल्यामुळे रात्री 11 पर्येंत माझ्या कुटुंबाला व मला उपाशी रहावं लागलं. माझ्या काही मित्रांनी देखील मला असे अनुभव दिले. मला त्यांना दुःखी करायचे नसून मला कोरोनामुळे नाती कशी फिकी पडतात हे सांगायचे आहे. 

माझ्यासारख्या एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यास अशी वागणूक मिळत असेल तर तिथे सामान्य नागरिकांची काय बिशाद. माझ्या मालवाहक गाड्या आहेत ज्या गाड्यांवर मी ड्राईव्हर ठेवलेले आहेत. मी कोरोना पॉझिटिव्ह नव्हतो तोपर्यंत सर्व सुरळीत होते. परंतु मी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या मालवाहक गाड्यांवरील माणसांना देखील गेरेजमध्ये योग्य वागणूक मिळाली नाही. तुमचा मालक कोरोनाग्रस्त आहे. येथे काम होणार नाही हे सांगून हाकलून दिले. मनाला वेदना देणाऱ्या या गोष्टी आहेत. कोरोनाने कधीच माणस मरत नाहीत. मरता ती मानसिक धक्क्याने, कोरोना पेशंट सोबतच्या वागणुकीने, आणि भीतीने. माझ्यासाठी लढणारे माझे अनेक मित्र आहेत जे आजही त्यांचा जीव धोक्यात घालून मला मी ऍडमिट असणाऱ्या हॉस्पिटल बाहेर आवश्यक गोष्टी देऊन जातात. ते निश्चित हॉस्पिटलच्या गेटवर वस्तू ठेऊन जात असतील पण त्यांच माझ्यासाठी असणार प्रेम त्यातून दिसून देत. माझ्या घरी देखील माझे काही मित्र काही मदत लागली तर पोहच करतात. याच मित्रांनी मला धीर देण्याचे काम केले. हाताची सगळी बोट सारखी नसतात याप्रमाणे मला देखील काही व्यक्तींनी माझ्या वाईट काळात दुःखादायक अनुभव दिले. मी त्यांची तक्रार म्हणून हे लिहीत नसून त्यांना विनंती म्हणून हे लिहीत आहे, की कृपया असे वागू नका. या परिस्थितीत असणाऱ्या व्यक्तीसाठी हे वेदनादायी आहे. आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. की माझ्या घरातील सर्व सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत व ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे मी देखील लवकर बरे होऊन तुमच्या सगळ्यांमध्ये परत येईल.

माझ्या या पत्रामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. मला कोनाविषयी राग नाही, किंवा द्वेषही नाही फक्त माझ्या मनातील खंत मी आज व्यक्त केली.कोरोनच्या काळात मी व संदीप शेनकर यांनी शहराच्या व परिसराच्या आरोग्यसाठी जीवाचे रान केले मात्र आज मला व कुटुंबाला दूर लोटत आहे माझ्यासारख्या राजकीय माणसाची हि अवस्था तर सर्वसामान्य माणसाचे काय? कोरोना नाही तर माणसे ओळखायला पारखायला मी चुकलो. 
धन्यवाद…!

- नितीन नाईकवाडी, कोले शहराध्यक्ष शिवसेना

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akole taluka Shivsena leader Nitin Naikwadi corona test positive