आतापर्यंत कोरोनाच्या संदर्भात झोपेचे सोंग घेतले होते पण... तहसीलदारांचे भावनिक पत्र व्हायरल

Akole taluka tehsildar Mukesh Kamble emotional letter viral
Akole taluka tehsildar Mukesh Kamble emotional letter viral

अकोले (अहमदनगर) : तालुक्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अकोले तालुका व शहरवासीयांसाठी महत्वाची सूचना व नम्र निवेदन सादर केले आहे. ज्यांनी आतापर्यंत कोरोनाच्या संदर्भात ‘झोपेचे सोंग’ घेतले होते, अशा समाजाला जागे करणारा असा संदेश त्यांनी दिला आहे. 

कांबळे यांनी म्हटलं आहे की, लॉकडाऊनच्या काळात जवळपास तीन महिने तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नसतांना आपण सर्वजण खूप जागरूकपणे, संयमाने, कदाचित भीतीमुळे घरात राहिलात. लॉकडाऊन शिथिल झाले आणि आपल्याकडे वर्दळ वाढली. पाहुणे आले, आपण बाहेर पाहुणे म्हणून गेलो. कधी पास घेऊन तर कधी चोरून! कधी नाईलाज म्हणून तर कधी हौस म्हणून. कधी पार्टी तर कधी लग्न... प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण अंमलात आणले. त्याला आपण खूप पाठिंबा दिला.

क्वचितच विरोध, तक्रारी झाल्या. मात्र दिड महिना आपल्या बाजारपेठा फुलल्या, रस्ते गजबजले आणि परिणाम स्वरूप सर्वात सुरक्षित समजले जाणारे अकोले आज तब्बल २०० कोरोनाबाधित आणि शेकडो संशयित रुग्णांनी गजबजले आहे. 

लवकरच हा आकडा वाढत जाऊन आपले बाहेर पडणे दुष्कर करणार आहे. कदाचित 85 टक्के लोकांना कोरोना होत नाही किंवा आपोआप बरे होतात हा अतिविश्वास याला कारणीभूत असावा. तो खरा असेलही पण आपण घरातल्या वयस्कर, मधुमेही, उच्च रक्तदाब, हृदयरोग इतर आजार असलेल्या 15 टक्के व्यक्तींना सोयीस्करपणे विसरलो नाहीत का? तालुक्याची लोकसंख्या 3.५ लाख गृहीत धरली तरी 50-60 हजार नागरिक धोकादायक गटात येतात. आपल्या तालुक्यात एकावेळी जास्तीत जास्त 100-150 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. याहून एकावेळी जास्त झाले तर आपण.

आपले प्रियजन कुठे असु?... शांतपणे विचार करा, घरातल्या सदस्यांवर नजर फिरवा, आपण कोणाचा जीव धोक्यात घालतोय? संशयित अथवा कोरोना रुग्ण म्हणून अनुभव घेतलेल्यांचे अनुभव ऐका किंवा वाचा (तसे व्हाट्सएपवर पुष्कळ आपण वाचलेत), प्रशासन जीव तोडून प्रयत्न करत असले तरी इतक्या अफाट लोकसंख्येला प्रत्येकाच्या मनासारख्या सुविधा देणे केवळ अशक्य आहे हे नीट समजून घ्या. 

कोरोना रुग्णाला जर एखाद्या खोलीत उपचारासाठी ठेवले तर तिथली किमान स्वच्छता देखील बाहेरूनच कोणीतरी येऊन करावी अशी अपेक्षा केली जाते. मात्र आपण स्वतः कसे सगळ्यांना चकवा देत, विनापरवाना लांब- लांब फिरून आलोय आणि अनेकांचा जीव धोक्यात घातलाय याचा सोयीस्कर विसर मात्र पडतो! उपजीविकेसाठी,कर्तव्यासाठी जरूर बाहेर पडा. त्यात बाधित झालात तर निदान एक वेगळी शक्ती तुमच्यासोबत असेल. मात्र विनाकारण फिरून बाधित झालात तर, कल्पना करा. तुमच्यामुळे तुमची लहान लहान मूलं, पत्नी, वृद्ध आई वडील कोरोना केअर सेंटरवर पोहोचली आहेत. त्यांची काळजी तुम्हाला लागली आहे. मनात धाकधूक होतेय. 

"गोष्ट हातातली होती"असा पश्चाताप होतोय, चिडचिड होतेय, असहाय्य वाटतय अकोलेवासीयांनो, हे सगळं कोरोनापेक्षा भयावह आहे. कोरोनातून आपण नक्की बरे व्हाल पण चुकून कोणाला गमवावं लागलं तर? शासन, प्रशासन सगळी काम सोडून का विनवण्या करत आहे. विचार करा आणि फालतू बाहेर फिरायचं बंद करा, हे मैदानावर खेळण्याचे दिवस नाहीत याच भान ठेवा! आता अकोलेत कोरोना खऱ्या अर्थाने प्रकटला आहे! पुन्हा एकदा सुरुवातीला दाखवलेले भान, समजदारपणा दाखवुया आणि कोरोनाचा प्रसार थांबवूया.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com