esakal | वाटलं नव्हतं जवळचे हे नेते धोका देतील, बाळासाहेब विखे पाटलांची आत्मचरित्रातून सल
sakal

बोलून बातमी शोधा

Allegations against Gadakh and Pachpute in Vikhe Patil's autobiography

माजी केंद्रीय मंत्री (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांनी तर दिल्ली गाजवून सोडली. त्यांच्या वडिलांनी उभारलेला सहकारातील पहिला साखर कारखाना तर सर्वांच्याच परिचयाचा आहे.

वाटलं नव्हतं जवळचे हे नेते धोका देतील, बाळासाहेब विखे पाटलांची आत्मचरित्रातून सल

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर : महाराष्ट्रात साखरेचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला मोठे महत्त्व आहे. राजकारणात तर या जिल्ह्याची वेगळीच छाप होती. अगदी देशाच्या राजकारणातही नगरचा ठसा आहे. विशेषतः विखे पाटील, थोरात, आदिक आणि अलिकडे बारामतीच्या पवार घराण्याचीही एंट्री झाली आहे.

माजी केंद्रीय मंत्री (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांनी तर दिल्ली गाजवून सोडली. त्यांच्या वडिलांनी उभारलेला सहकारातील पहिला साखर कारखाना तर सर्वांच्याच परिचयाचा आहे. विखे घराण्याने शिक्षण, सांस्कृतिक, आरोग्य, शेती क्षेत्रात मोठे काम केलं आहे. दिल्लीतील कोणत्याही पक्षातील दिग्गज नेता लोणीला आला नाही, असे नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही लोणीतील विकासाचं कौतुक असतं. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विखे पाटलांच्या `देह वेचावा कारणी` आत्मचरित्राचे प्रकाशन झाले.

या आत्मचरित्रात विखे पाटलांनी विविध राजकीय गुपितं उघड केली आहेत. कोणत्या नेत्यांनी आपला फायदा घेत राजकीय बस्तान बसवलं आणि नंतर फसवलं याचाही खुलासा  विखे पाटील यांनी केला आहे. श्रीगोंद्याच्या भाजपच्या विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याविषयी विखे पाटलांनी या पुस्तकात उल्लेख केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी त्यांनी माझ्या सर्व `गुडविल्स` वापरल्या. पण ऐनवेळी त्यांनी फसवलं. विश्वासाला तडा गेला.

विखे पाटील यांना 1991 च्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण या मतदारसंघात काॅंग्रेसने उमेदवारी डावलली होती. यामागे नक्कीच राजकारण होतं. त्यामुळे स्वाभीमान दुखावलेल्या विखे पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. 

काॅंग्रेसकडून यशवंतराव गडाख हे उमेदवार होते. चुरशीने लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत गडाख विजयी झाले. परंतु ही निवडणूक न्यायालयात गेली. विखे पाटील यांनी या निवडणुकीत आचार संहित भंग झाल्याची तक्रार केली होती. यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही आरोप होते. न्यायालयाने गडाख यांची निवड रद्द ठऱवली.

या निवडणुकीत पराभव झाल्याची खंत विखे पाटलांना शेवटपर्यंत होती. त्या निवडणुकीतील अंतर्गत घडलेल्या घडामोडींचा पटच पुस्तकात मांडला आहे. कोणी ऐनवेळी दगा दिला, याचाही उल्लेख पुस्तकात आहे.

श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते आणि नेवाशाचे तुकाराम गडाख यांचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, विखे पाटील निवडणुकीत पराभूत झाले, ही कल्पना लोकांना असह्य होती. गडाखांची निवड रद्दबादल झाल्यानंतर मला निवडणुकीला उभे राहा, असा जिल्ह्यातून आणि राज्यातूनही आग्रह सुरू झाला. कार्यकर्त्यांना सुरसुरी होती. ज्यांच्यावर माझा भरवसा तो नेवासा विधानसभा मतदारसंघ तुकाराम गडाखांंचा आणि श्रीगोंदा बबनराव पाचपुतेंचा. दोघंही बरोबर प्रचाराला हिंडले. पण नेमकं याच दोन मतदारसंघात कुठे माशी शिंकली माहिती नाही. पण मला मतं कमी पडली. इथचं दोन ठिकाणी धोका होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. यात विरोधकांचा संबंध नाही. ज्यांना मी मदत केली. त्यांनीच धोका दिला?

मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात बबनरावांना मंत्री करण्यासाठी मी शब्द टाकावा, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी मी माझ्या सगळ्या `गुडविल्स` वापरल्या. तुकाराम गडाख आणि यशवंतराव गडाख यांच्यामध्ये प्रचंड वैमनस्य होतं. त्यामुळे न्यायालयीन लढ्यात आमच्या बाजूनं साक्ष देण्यासाठी तुकाराम गडाखांचे काही साथीदार तयार झाले होते. अगदी विश्वास असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे झालं. पण ऐन वेळी त्यांनी फसवलं. वरील दोन्ही व्यक्तींच्या बाबतीत विश्वासाला तडा गेला. तरीही मी त्यांना दूर केलं नाही. नंतरही तुकाराम गडाख खासदारकीला उभे राहिले. तेव्हाही मी त्यांना मदतच केली, असाही उल्लेख विखे पाटील करतात.