श्रीगोंदा पालिकेवरील आरोपांची होणार चौकशी

संजय आ. काटे
Thursday, 14 January 2021

घनकचरा ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे फॉगिंग मशिन आणि घंटागाडी जळून पालिकेचे आर्थिक नुकसान झाले. विनापरवाना रस्तेखोदाईप्रकरणी मोबाईल कंपनीला झालेल्या दंडवसुलीस टाळाटाळ होत आहे.

श्रीगोंदे : नगरपालिकेतील अनेक कामांच्या अनियमिततेबाबत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्यानंतर आता त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याची माहिती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी दिली. 

हेही वाचा - नाद केला पण अंगलट आला

भोस म्हणाले, ""पालिकेत मोठा गोंधळ आहे. याबाबत लेखी तक्रारी करूनही जिल्हा प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर ब्रिगेडने आंदोलनाची भूमिका घेतली. जिल्हा प्रशासनाधिकाऱ्यांच्या दालनात संभाजी ब्रिगेडने 10 डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी आरोपांची चौकशी करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाधिकारी दत्तात्रेय लांघी यांना काढला.'' 

भोस यांच्यासह शहराध्यक्ष सतीश बोरुडे, ऍड. समीत बोरुडे यांनी यासाठी पाठपुरावा केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी ई. बी. एन्व्हायरो बायोटेक कंपनीला पालिकेने बेकायदा दिलेल्या ठेक्‍यात लाखो रुपयांचा अपहार झाला आहे.

घनकचरा ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे फॉगिंग मशिन आणि घंटागाडी जळून पालिकेचे आर्थिक नुकसान झाले. विनापरवाना रस्तेखोदाईप्रकरणी मोबाईल कंपनीला झालेल्या दंडवसुलीस टाळाटाळ होत आहे.

विद्युत विभागातील देखभाल- दुरुस्तीच्या बेकायदा मंजूर केलेला व त्यास मुदतवाढ देत चालू असलेला ठेका रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegations in Shrigonda Municipality will be investigated