चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, पोलिस निरीक्षकांच्या शिष्टाईमुळे तणाव निवळला

आनंद गायकवाड
Friday, 27 November 2020

पठारभागातील बिरेवाडी येथील महिलेला पोटाच्या विकारावरील उपचारासाठी संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्याच्या पठारभागातील बिरेवाडी येथील महिलेला पोटाच्या विकारावरील उपचारासाठी संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिची प्रकृती खालावली. तिला शहरातीलच दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची घटना काल पहाटे दिडच्या सुमारास घडली.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरेवाडी येथील संगिता अंकुश पठारे (वय 35) या महिलेला पोटाच्या विकारावरील उपचारांसाठी संगमनेरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना, तीची प्रकृती बिघडल्याने तिला रात्री एकच्या सुमारास शहरातील दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू ओढवला. तिला चार व सहा वर्ष वयाची दोन मुले आहेत. सकाळी संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरां चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ही माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकूंद देशमुख व सहायक निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस निरीक्षक देशमुख यांनी मयताच्या नातेवाईक, डॉ. राजेश भोलाणे व दुसर्‍या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसह शहरातील अन्य डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराची पद्धत आणि रुग्ण दगावण्यामागच्या कारणांची चिकित्सा करुन, समन्वयातून शिष्टाई केली. त्यानंतर तिचा मृतदेह लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alleged death of woman due to wrong treatment in Sangamner taluka