राहुरीत कासार यांची पोपळघट यांच्यासाठी माघार

विलास कुलकर्णी
Thursday, 24 September 2020

राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांची विधानसभेवर निवड होऊन, राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, रिक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

राहुरी : राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनिल कासार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे, अनिता दशरथ पोपळघट यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिला आहे.

उद्या शुक्रवारी (ता. 25) नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बैठक होणार आहे. त्यात पोपळघट यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. 

राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांची विधानसभेवर निवड होऊन, राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, रिक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे पूर्ण बहुमत आहे. इतर मागास प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे. अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

कासार यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे जनसेवा मंडळाचे पक्षश्रेष्ठी माजी खासदार प्रसाद तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व पालिकेतील गटनेत्या डॉ. उषा तनपुरे यांच्या चर्चेनंतर दिलेल्या आदेशानुसार कासार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. 

उद्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक होणार आहे. त्यात, पोपळघट यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होईल. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Kasar withdrew the application at Rahuri