आंदोलक शेतकरी पाकिस्तानी आहेत का? ; अण्णा हजारे यांची केंद्र सरकारवर टीका

मार्तंड बुचुडे
Monday, 30 November 2020

दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.

पारनेर (अहमदनगर) : दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. हे चुकीचे असून, निवडणुका आल्या की शेतकऱ्यांच्या बांधावर मते मागण्यासाठी जाणारे, शेतात काम करण्याचेही नाटक करणारे नेते आता का गप्प आहेत?

शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेऊन सरकारने त्यांच्यासोबत चर्चा करायला काय हरकत आहे, हे शेतकरी काय पाकिस्तानी आहेत का, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा दिला आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कृषि कायद्याविरुद्ध दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर लाठीहल्ला केल्याने हजारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ""निवडणूक काळात नेत्यांना शेतकऱ्यांच्या समस्या दिसतात. त्यांच्या गाठी-भेटी घेण्यासाठी थेट शेतात, त्यांच्या घरी जातात; मग आता शेतककऱ्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा का करीत नाही. केंद्र सरकारने या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे.'' 

शेतकऱ्यांना केंद्र सरकार देत असलेल्या वागणुकीबाबत हजारे म्हणाले, की कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांला सरकारकडून दिली जाणारी वागणूक चुकीची आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर मते मागायला जाता. मग त्यांच्या मागण्यांवर चर्चा का करत नाही? दिल्ली येथे शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. त्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतकरी आज संयमाने आंदोलन करीत आहेत. भविष्यात त्यांचे हिंसात्मक आंदोलन सुरू झाले, तर त्यास जबाबदार कोण?'' 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna Hazare criticism of the BJP government at the Center