मुख्यमंत्री ठाकरे सरकारला अण्णा हजारे यांचा इशारा; लोकायुक्त कायदा न केल्यास आंदोलन करणार

एकनाथ भालेकर
Sunday, 8 November 2020

राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पाच मंत्र्यांसोबत पाच वेळा पत्रव्यवहार केला.

राळेगण सिद्धी (अहमदनगर) : राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पाच मंत्र्यांसोबत पाच वेळा पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना साथ संपल्यानंतर लोकायुक्त कायद्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन लेखी पत्र पाठवून दिले आहे. परंतु, इतर कोणत्याही मंत्र्यांनी पत्राचे उत्तर दिलेले नाही.

येत्या काळात राज्य सरकारने लोकायुक्त कायदा करण्याबाबत चालढकल केली तर वेळप्रसंगी राज्यभर दौरे करून लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलन करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हजारे यांनी लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलनाची तयारी करत असल्याचे सांगीतले. हजारे म्हणाले, मागील राज्यातील युती सरकार विरोधात आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगण सिद्धीत येऊन लोकायुक्त कायद्यासाठी मसुदा समितीला मान्यता दिली. त्यानंतर लोकायुक्त कायदा मसुदा समिती स्थापन झाली होती.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे माझ्यासह पाच कार्यकर्ते तसेच  मुख्य सचिवांसह पाच सचिवांसोबत अनेक बैठकांत चर्चा करून लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. निवडणुकीनंतर राज्य सरकार बदलल्यानंतर लोकायुक्त कायद्याला विधानसभा व विधानपरिषदेत मंजुरी मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व काही मंत्र्यांशी पाच वेळा पत्रव्यवहार केला.  मुख्यमंत्री ठाकरे वगळता इतर मंत्र्यांनी पत्राचे उत्तर दिले नाही.

आंदोलनाची तयारी म्हणून लोकशिक्षण व लोकजागृतीसाठी दहा ते बारा ध्वनीचित्रफिती तयार केल्या आहेत. त्या युट्यूबच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचणार आहेत.  त्यात उपदेश व मार्गदर्शन वगैरे काही नाही फक्त केलेल्या सामाजिक कामांचे व आंदोलनाचे अनुभव मांडलेले आहेत. युवा शक्ती ही खरी राष्ट्रशक्ती आहे. तरूणांमध्ये जनजागृती होऊन विधायक आंदोलनात तरूणांनी पुढे आले पाहिजे.

४० वर्षांपासून केलेल्या आंदोलनात मी आत्तापर्यंत २० उपोषणे केली. भ्रष्टाचाराला आळा बसावा व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी लोकपाल कायदा, माहितीचा अधिकार कायदा, दप्तर दिरंगाई, बदल्यां असे १० कायदे राज्य व केंद्र सरकारला करावे लागले. आंदोलनाने ६ मंत्र्यांना घरी जावे लागले तर अनेक अधिकारी घरी गेले. २० उपोषण काळातील आंदोलनाच्या अनुभवावर मी सध्या लेखन करीत आहे. लवकरच २० उपोषणे हे लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्यात येईल.

राज्य सरकारच्या कामांबद्दल काय वाटते या प्रश्नांवर हजारे  म्हणाले हे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी सारखा प्रकार आहे. कधी बंद पडेल सांगता येणार नाही.  राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी ठोस निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले.

लोकायुक्त कायद्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहणार का? या प्रश्नावर हजारे म्हणाले सध्या घटनात्मक पद त्यांच्याकडे नसल्याने मी का पत्र लिहू. राज्याचे घटनात्मक पद ज्यांच्याकडे त्यांना मी पत्रे लिहली आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna Hazare warns Chief Minister Thackeray government for Lokayukta Act