
नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आ. लंके यांनी बिनविरोध निवडणूक करा गावासाठी २५ लाख रूपयांचा निधी घ्या असे आवाहन केले होते.
पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी असलेल्या राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. आमदार नीलेश लंके यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या सुपे येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आ. लंके यांनी बिनविरोध निवडणूक करा गावासाठी २५ लाख रूपयांचा निधी घ्या असे आवाहन केले होते. आ. लंके यांच्या या आवाहनाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी स्वागत केले. या निर्णयामुळे गावामधील भांडणे थांबतील व गावाच्या विकासाची घोडदौड सुरू होईल असे मत हजारे व पवार यांनी व्यक्त केले होते.
हेही वाचा - सुजय विखे पाटील होणार केंद्रात मंत्री
आमदार लंकेंचा पुढाकार महत्त्वाचा
शुक्रवारी आ. लंके यांनी सुपे जिल्हा परिषदेच्या गटातील विविध गावांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. सुपे गटात असलेल्या राळेगणसिद्धीचाही त्यात समावेश होता. राळेगणसिद्धीची बैठक सुरू झाली व काही वेळातच दोन्ही गटांनी बिनविरोध निवडणूक करण्याच्या निर्णयावर सहमती दर्शविली. या बैठकीस माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेश औटी, सुरेश पठारे, दत्ता आवारी हे प्रमुख कर्यकर्ते उपस्थित होते.
बिनविरोध निवडणुकीसंदर्भात मापारी, औटी, पठारे तसेच आवारी यांच्याशी संपर्क साधला असता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच आमदार नीलेश लंक यांनी निवडणूक बिनविरोध करून गावातील वाद टाळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अण्णा सर्वांसाठीच मार्गदर्शक आहेत.
आ. लंके यांनीही अण्णांच्या विचारांशी सुसंगत भुमिका घेतल्याने आम्ही सर्वांनी हेवेेदावे विसरून एकमताने बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमध्येही असाच निर्णय व्हावा अशी अपेक्षा मापारी, औटी, पठारे तसेच आवारी यांनी व्यक्त केली.
हजारे यांना आनंद
सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतल्याबददल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आनंद व्यक्त केला. आ. लंके यांनी राळेगणसिद्धीची निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती हजारे यांना दिल्यानंतर अण्णांनी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. विविध गावांच्या कार्यकर्त्यांनी एकमताने निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णय घेउन आदर्श निर्माण करण्याचे आवाहन हजारे यांनी केले.
चार आणि पाच जागांचा फॉर्म्युला
राळेगणसिद्धीच्या या निर्णयामुळे तालुक्यासह राज्यात चांगला संदेश जाईल, असे हजारे यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी सकाळी हजारे व आ. लंके यांची राळेगणसिद्धीत बैठक होणार आहे. ज्यांचा प्रथम अडीच वर्षे सरपंच त्यांना 4 जागा व नंतरच्या अडीच वर्षांसाठी ज्यांना संधी त्यांच्या 5 जागा असा फॉर्म्युला ठरल्यानेच ग्रामपंचायत बिनविरोधचा तोडगा निघाला.
संपादन - अशोक निंबाळकर