
काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. विखे पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात आपण केंद्रात राज्यमंत्री होणार असल्याचे विधान केले होते. मात्र, त्यावेळी त्यांचे हे विधान कुणी फारसे गांभीर्याने घेतले नव्हते.
शिर्डी ः आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मतदारसंघातील एखाद्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली की आणखी काही, याबाबत चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यातील भाजपच्या एका नेत्याच्या निरीक्षणानुसार, राज्यातील साखर कारखानदारीच्या प्रश्नावर काही दिवसांपूर्वी आमदार विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री शहा यांची भेट घेतली होती. मात्र, सध्या भाजपचे केंद्रातील नेते पश्चिम बंगालच्या निवडणुकीत व्यग्र आहेत. त्यात शहा यांच्यावर सर्वाधिक महत्वाची जबाबदारी आहे.
अशा व्यस्त काळात ही भेट झाली. त्यासाठी त्यांना शहा यांची वेळ मिळाली. त्याअर्थी कामही तेवढेच महत्त्वाचे असावे, असा तर्क लावला जात आहे.
केंद्रात मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात पश्चिम बंगालमधील काही चेहेऱ्यांचा जाणीवपूर्वक समावेश होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात हुकलेली सत्तेची संधी परत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे युवा नेते ज्योतीरादित्य सिंधीया, कर्नाटकातील युवा चेहरा तेजस्वी सूर्या यांना मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळेल. अशी चर्चा होती. मात्र, सूर्या यांना भाजयुमोचे केंद्रीय अध्यक्षपद देण्यात आले. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. विखे पाटील यांची मंत्रीमंडळात समावेश व्हावा, यादृष्टीने ही भेट असू शकते, असे या नेत्याने सांगितले.
हेही वाचा - कर्जत-जामखेडच्या पोलिसांना मिळाले अनोखे गिफ्ट
काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. विखे पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात आपण केंद्रात राज्यमंत्री होणार असल्याचे विधान केले होते. मात्र, त्यावेळी त्यांचे हे विधान कुणी फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. या विधानाचा व या भेटीचा काही संबंध आहे का, याबाबत मतदारसंघात चर्चा सुरू आहे.
राज्यात आघाडी सरकारसोबत संघर्षाची वेळ आली, तर आपली उपयुक्तता लक्षात आणून देण्यासाठीही ही व्यूहरचना असावी, असा काहींचा कयास आहे. केंद्रीय नेत्यांच्या भेटी असो की मतदारसंघातील नित्याचे राजकीय कार्यक्रम, त्याचे फोटो व माहिती विखे पिता-पूत्र सोशल मीडियावर टाकत असतात. मात्र, केंद्रीय मंत्री शहा यांच्या या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर टाकले नाहीत. मात्र हे फोटो आपल्या चाहत्यांपर्यत जातील अशी व्यवस्था मात्र केली. त्यामुळे या भेटीबाबत तर्क लढविले जाऊ लागले आहेत.