वाचकांसाठी आनंदाची बातमी ः कोणतेही पुस्तक मिळणार एकाच क्लिकवर

अमित आवारी
Thursday, 7 January 2021

राज्यात शासकीय ग्रंथालये पारंपरिक पद्धतीने सेवा देत होती. त्या मानाने खासगी, महाविद्यालयीन व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये विविध सॉफ्टवेअरच्या मदतीने ग्रंथांच्या नोंदी ठेवत आहेत.

नगर ः राज्यात 43 शासकीय ग्रंथालये असून, तेथील ग्रंथ व सभासदांची सर्व माहिती ऑनलाइन करण्यात येत आहे. त्यामुळे ही सर्व ग्रंथालये एकमेकांशी जोडली जाणार आहेत. त्यातून ग्रंथालयांतील विविध सूचीची जंत्री हद्दपार होईल. एका क्‍लिकवर ग्रंथांची सर्व माहिती मिळणार आहे. 

राज्यात शासकीय ग्रंथालये पारंपरिक पद्धतीने सेवा देत होती. त्या मानाने खासगी, महाविद्यालयीन व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये विविध सॉफ्टवेअरच्या मदतीने ग्रंथांच्या नोंदी ठेवत आहेत. त्यांच्याकडे ग्रंथांची सर्व माहिती अवघ्या काही सेकंदात मिळत होती. मात्र, शासकीय ग्रंथालयांत अशी सोय नव्हती. त्यामुळे सभासद फी अतिशय कमी व ग्रंथ संख्या जास्त असतानाही या ग्रंथालयांतून वाचकांना जलद व चांगली सेवा मिळत नव्हती. 

राज्य शासनाच्या ग्रंथालय संचलनालयाने हे चित्र बदलण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय ग्रंथालयांतील ग्रंथ व सभासदांची माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये आणण्याचे काम सुरू केले. त्यामुळे आता एका क्‍लिकवर माहिती मिळणार आहे. ई-जी फोर असे या क्‍लाऊडबेस सॉफ्टवेअरचे नाव आहे.

हे सॉफ्टवेअर नॅशनल इम्फॉरमेटिक सेंटर (एनआयसी)ने तयार केले आहे. त्यात ग्रंथाची नोंद होताच, त्याचे आपोआप बारकोडींग होते. त्यामुळे ग्रंथाचे ग्रंथालयातील स्थान लगेच लक्षात येणार आहे. वाचकांनी ग्रंथालयातून नेलेल्या पुस्तकाची मुदत संपल्यास वाचकाला ई-मेलवर पुस्तक परत करण्याबाबत सूचना पाठविण्यात येईल.

शिवाय ग्रंथनाम, लेखनाम, विषयनाम सूचींची जंत्री ग्रंथालयातून हद्दपार होणार आहे. त्या जागी बारकोडींग व ऑनलाइन ग्रंथसूचीचा वापर अधिकारी-कर्मचारी करताना दिसणार आहेत. 
लॉकडाउन काळात वाचक ग्रंथालयात येऊ शकत नव्हते.

हेही वाचा - माजी आमदार कर्डिलेंना गावातच पुतण्याचे आव्हान

या काळात ग्रंथालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ग्रंथ व सभासदांच्या ऑनलाइन नोंदीचे काम पूर्ण केले. शासकीय ग्रंथालयात वाचकाला हवे असलेले पुस्तक नसल्यास ते दुसऱ्या शासकीय ग्रंथालयात आहे का, याची माहिती मिळू शकेल. त्यामुळे वाचकांना हवे असलेले पुस्तक साखळी योजनेतून लवकर उपलब्ध करून देता येणार आहे. 
 

लॉनडाउन काळात ग्रंथ व सभासदांच्या ऑनलाइन नोंदीचे काम केले. सध्या 12 हजार 148 पुस्तके व 80 सभासदांच्या नोंदी झाल्या आहेत. ई-जी फोरमुळे वाचकांना अधिक चांगली सेवा देणे सहजशक्‍य होईल. 
- अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: any book will be available with a single click

Tags
टॉपिकस
Topic Tags: