माजी आमदार कर्डिलेंना गावातच पुतण्याचेच आव्हान, म्हणाले असू दे डिपॉझिटच जप्त करतो

दत्ता इंगळे
Thursday, 7 January 2021

कर्डिले म्हणाले, गेली 30 ते 35 वर्षे बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत बिनविरोध होत होती. पण मी केलेला विकास विरोधकांना बघवत नाही. फक्त विरोध करण्यासाठी ही निवडणूक लादली.

नगर तालुका ः या वर्षी ही निवडणुक बिनविरोध झाली असती पण, केवळ विरोधासाठी विरोध म्हणून ही निवडणूक होत आहे. मला श्रेय मिळू नये म्हणून तांत्रिकदृष्ट्या ती लादली गेली असली तरी 7 जागांसाठी होणाऱ्या बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले. 

बुऱ्हाणनगर येथे ग्रामस्थ, कार्यकर्ते व बाणेश्‍वर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना मार्गदर्शन करतांना कर्डिले बोलत होते. यावेळी प्रकाश कर्डिले, अक्षय कर्डिले, दत्ता ताकपिरे, हभप मोहिते महाराज उपस्थित होते. 

कर्डिले म्हणाले, गेली 30 ते 35 वर्षे बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत बिनविरोध होत होती. पण मी केलेला विकास विरोधकांना बघवत नाही. फक्त विरोध करण्यासाठी ही निवडणूक लादली.

हेही वाचा - लॉकडाउनमध्ये फासे पारधी समाजातील मुलांनी घेतल्या म्हशी

विधानसभेला माझा पराभवाचा आनंद फक्त पुढाऱ्यांना झाला. पण सर्वसामान्यांना मात्र दु:ख झाले होते. विकास कामात माझा कोणीच हात धरु शकत नाही. संपूर्ण तालुक्‍यासह बुऱ्हाणनगरच्या हद्दीतील उपनगरांमधील पाणीप्रश्‍न, विजेचा प्रश्‍न, रस्ते अशा मुलभुत सुविधा सोडविल्या आहेत.

जनता पाठिशी असल्याने मला पराभवाची भिती नाही. या ग्रामपंचायत निवडणुकीत सातही उमेदवार विजयी होतील तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Burhannagar Gram Panchayat, former MLA Kardile is challenged by his nephew