कोरोनाचे आव्हान परतवून लावल्यासच गळीत हंगाम यशस्वी

मनोज जोशी
Monday, 28 September 2020

चालू गळीत हंगामात कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध असल्याने व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी आपल्या ट्रकची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करून घ्यावी, म्हणजे ऊसवाहतूक करताना अडचणी येणार नाहीत.

कोपरगाव : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध आहे. गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्स्पोर्ट कंपनीला कोरोनाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. 

गोदावरी खोरे केन ट्रान्स्पोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ""चालू गळीत हंगामात कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध असल्याने व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी आपल्या ट्रकची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करून घ्यावी, म्हणजे ऊसवाहतूक करताना अडचणी येणार नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ट्रकचालक व मालकांनी काळजी घ्यावी. सॅनिटायझर व मास्कचा वापर करून व सोशल डिस्टन्सिंग पाळून कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवावे. चांगल्या प्रकारे व्यवसाय करून कंपनीस व कृषी विभागास सहकार्य करावे.'' 

गोदावरी खोरे केन ट्रान्स्पोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे यांनी प्रास्ताविक, सरव्यवस्थापक सोपान डांगे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विजय जाधव यांनी आभार मानले.

ज्येष्ठ संचालक छबूराव आव्हाड, काळे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक विश्वास आहेर, ज्ञानदेव मांजरे, सुनील शिंदे, काकासाहेब जावळे, दिलीप शिंदे, भिकाजी सोनवणे, कारखान्याचे सरव्यवस्थापक सुनील कोल्हे व सभासद सोशल डिस्टन्सिंग ठेवून उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal to make Kopargaon factory season a success