मुस्लिम मामाने केलं भाच्यांचे कन्यादान अन धाय मोकलून रडलाही...सोशल मीडियात होतेय चर्चा

प्रवीण पाटील
Saturday, 22 August 2020

बाबाभाई गावच्या विविध धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात. गेल्या वर्षी गावातील सप्ताहाला देणगी देतानाचा तसेच शिवजयंतीत भगवा झेंडा घेवून सगळ्यांच्या पुढे असलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला होता. खरं तर बाबाभाई पाच वेळेचे नमाजी आहेत. अल्लाहला मानतात.

बोधेगाव : मानलेल्या बहिणीच्या मुलींची सासरी पाठवणी करताना मामा धाय मोकलून रडला. हे रडणारे सह्रदय संवेदनशील मामा दुसरा तिसरा कोणी नसून बोधेगाव येथील बाबाभाई पठाण आहेत. मामाने केलेल्या कन्यादानाचे सोशल मीडियावर कौतुक आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या लग्न सोहळ्याची दखल घेतली आहे. पठाण यांच्या धार्मिक सलोख्यावर हा माझा भारत आहे असं ट्विट केलं आहे.

बोधेगाव तालुका शेवगाव येथील भुसारी-तट्टू परिवाराच्या गौरी व सावरी दोन बहिणी  मुंगी येथील जाधव कुंटुंबातील अक्षय आणि आकाश या दोन भावांशी विवाहबद्ध झाल्या. हा सोहळा अनुपम झाला तो मुलींचा मामा बाबा पठाण यांच्या सुपारी फोडण्यापासून मुलींना वाटे लावण्यापर्यत पार पाडलेल्या महत्वाच्या भुमिकेमुळे.

सविता टटू-भुसारी यांना सख्खा भाऊ नसल्याने या लहानपासूनच बाबा पठाण यांना त्या आपला भाऊ मानतात. प्रत्येक राखी पोर्णिमेला बाबा पठाण हे आवर्जून त्यांच्याकडून राखी बाधून येतात.

हे नातं जातीभेदाच्या पलिकडचे. म्हणूनच गौरी, सावरी व भाऊ करण यांना पठाण मामा वेगळ्या जातीचे कधीच वाटले नाही. तीच जबाबदारी पठाण मामांनी पार पाडली. मुंगी येथील जाधव परिवारातील दोन भावाना हूंडा न घेण्याच्या व मुलींचे शिक्षण पुढेही सुरुच ठेवण्याच्या अटीवर गौरी व सावरी यांचा विवाह त्यांच्याशी लावून दिला. तेव्हा मुलींही सासरी जाताना मामाच्या कुशीत हक्काने रडल्या.

बाबाभाई गावच्या विविध धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात. गेल्या वर्षी गावातील सप्ताहाला देणगी देतानाचा तसेच शिवजयंतीत भगवा झेंडा घेवून सगळ्यांच्या पुढे असलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला होता. खरं तर बाबाभाई पाच वेळेचे नमाजी आहेत. अल्लाहला मानतात.

परिसरातील बहुसंख्य जण बाबाभाईच्या आस्थेचा आणि धार्मिक प्रथाचा आदर करतात. इतरही धर्मातील आस्थांचा बाबाभाई आदर करतात. अलिकडच्या जातीय असहीष्णूतेच्या वातावरणात बंधुभाव दुर्मिळ होत चालला आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी धार्मिक द्वेषाचा बुद्धीने वावरणाऱ्या मानसिकतेमुळे जातीय तेढ निर्माण केली जाते. पण देशातील सामाजिक वटवृक्षाची बीजे ही प्रेमाने रोवलेली आहेत. त्यांना अशा कृतीतून जपण्याचे काम बाबाभाई व बोधेगाव ग्रामस्थांसारखे लोक करत आहेत .हेच या तून अधोरेखित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appreciate the work of Baba Pathan