
पावसाळ्यापूर्वीच शहरातील सर्व ओढे-नाले, गटारी साफ करणे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार बंधनकारक आहे. ही सफाई करताना नैसर्गिक प्रवाह खुले करण्यास सांगण्यात आले आहे.
ओढ्या-नाल्यावरील बांधकामांना नगररचनाची मंजुरी, सफाई कागदावर
नगर ः महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची आपत्ती व्यवस्थापनाची कामे कागदोपत्री उरकण्याचा घाट घातला आहे. शहरातील ओढ्या-नाल्यांवर महापालिकेच्या नगररचना विभागाने बांधकामाचे परवाने दिल्यामुळे ओढ्या-नाल्यांची सफाई वरच्यावर उरकावी लागत आहे. महापालिका प्रशासनाकडून ७० टक्के काम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पावसाळ्यापूर्वीच शहरातील सर्व ओढे-नाले, गटारी साफ करणे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार बंधनकारक आहे. ही सफाई करताना नैसर्गिक प्रवाह खुले करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, शहरातील ओढ्या-नाल्यांवर महापालिकेच्या नगररचना विभागाने बांधकामे करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे शहरातील ओढ्या-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह जागोजाग वळविण्याचा अथवा कमी करण्याचा प्रकार दिसून येतो. काही ठिकाणी तर मोठ्या ओढ्या-नाल्यांना बंद गटारीचे स्वरूप देण्यात आले आहे. (Approval of town planning department for construction on the stream)
महापालिका प्रशासनाने यंदा १४ मे पासून ओढे-नाले सफाईचे काम हाती घेतले आहे. हे काम मागील अनेक वर्षांपासून एकाच ठेकेदार देण्यात येत आहे. ओढे-नाले सफाईसाठी चार पोकलेन, आवश्यकतेनुसार दोन जेसीबी कार्यरत आहेत. सफाई करताना बाहेर काढलेला गाळ हा ओढ्या-नाल्यांच्या लगतच टाकून दिला जात आहे. नागरीवस्तीचा भाग असल्यास तो उचलला जातो. इतर ठिकाणी मात्र तो उचलला जात नाही. पूर आल्यावर हाच गाळ पुन्हा नाल्यात पडतो. शहरातील गटार सफाईची कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या कामांन गती देणे आवश्यक आहे. अन्यथा एखादा मोठा पाऊस झाल्यास महापालिकेच्या कागदोपत्री नालेसफाई कामाची पोलखोल करू शकतो, अशी चर्चा रंगत आहे.
शहरातील ओढ्या-नाल्यांच्या प्रवाहात बांधकामे असली, तरी या बांधकामांना महापालिकेची बांधकाम परवानगी आहे. त्यामुळे या बांधकामांवर आम्हाला कारवाई करता येत नाही.
- सुरेश इथापे, शहर अभियंता, नगर महापालिका
नालेसफाईवर दरवर्षी होत असलेला २४ लाखांचा खर्च नागरिकांचा दिशाभूल करणारा आहे. नगररचना विभागाने ओढ्या-नाल्यांवर बांधकामांना परवानगी दिली, ही बाब गंभीर आहे. याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला हवा होता. झालेली सफाई योग्य नाही. या संदर्भात नागरी कृती मंचासमवेत महापालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी.
- शशिकांत चंगेडे, समाजसेवक.
- शहरातील ओढे-नाले - २०
- साफ झालेले ओढे-नाले - १२
(Approval of town planning department for construction on the stream)