राहुरी, कोपरगावात सौरऊर्जा प्रकल्पांना मंजुरी, मंत्री तनपुरे यांची माहिती

विलास कुलकर्णी
Wednesday, 20 January 2021

या सहा प्रकल्पांसाठी महावितरणकडे जमीन हस्तांतरण झाले आहे. येत्या चार महिन्यांत प्रकल्प उभारणी होऊन, तेथील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल.

राहुरी : मुख्यमंत्री सौरऊर्जा वाहिनी योजनेंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तालुक्‍यातील पाच ठिकाणी व कोपरगाव तालुक्‍यातील एका ठिकाणी मंजुरी मिळाली.

या सहा प्रकल्पांसाठी महावितरणकडे जमीन हस्तांतरण झाले आहे. येत्या चार महिन्यांत प्रकल्प उभारणी होऊन, तेथील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, असा विश्‍वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. 

मंत्री तनपुरे म्हणाले, की वांबोरी, गणेगाव, बाभुळगाव, आरडगाव व ताहाराबाद, तसेच कोपरगाव तालुक्‍यातील संवत्सर येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे. मागील सहा महिन्यांपासून या कामांसाठी वेळोवेळी बैठका घेत पाठपुरावा केला.

हेही वाचा - आता वडिलोपार्जित इस्टेट वाटपासाठी शुल्क लागणार नाही

एक हेक्‍टर जमिनीवर एक मेगावॅट वीजनिर्मिती होते. त्याद्वारे परिसरातील शंभर केव्हीए एक क्षमतेचे सात-आठ रोहित्र दिवसा चालू शकतात. एका शंभर केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावर 18 ते 20 शेतकऱ्यांचे वीजपंप असतात. 

वांबोरी 3.46 हेक्‍टर, गणेगाव 2.70 हेक्‍टर, बाभुळगाव 9.35 हेक्‍टर, आरडगाव 10 हेक्‍टर, ताहाराबाद 6 हेक्‍टर व संवत्सर 3.94 हेक्‍टर जमीन महावितरणकडे हस्तांतरण प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. येत्या चार महिन्यांत या सहा ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण होईल. नंतर या प्रकल्पांच्या ऊर्जा वाहिनीवरील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू केला जाईल, असे तनपुरे म्हणाले 

"मुळा'तील यांत्रिक बोट मंजूर 
मुळा धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी, जांभूळबन येथील गावकऱ्यांना राहुरीत येण्यासाठी यांत्रिक बोटीने प्रवास करावा लागतो. मागील काही वर्षांपासून यांत्रिक बोटीत वारंवार बिघाड होत होता. बोटीची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून, बोटीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे 60 लाख रुपये किंमतीची नवीन यांत्रिक बोट खरेदीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approval of solar energy projects in Rahuri, Kopargaon