उसाचे पुन्हा बहरले, नेवाशात तब्बल २७ हजार हेक्टर क्षेत्र वाढले

सुनील गर्जे
Sunday, 20 December 2020

गतवर्षी तालुक्यात साडेचार हजार हेक्टर उसाची लागवड होती. दरम्यान ज्ञानेश्वरचे कार्येक्षेत्रात असलेल्या शेवगाव तालुक्यात ११ हजार ५०० हेक्टर  उसाची लागवड झाली आहे.

नेवासे:  नेवासे तालुका हा उसाचा आगार म्हणून ओळखला जातो. इतर पिकांपेक्षा येथील शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. यंदा तालुक्यात ऊस लागवडीत तब्बल  २७ हजार हेक्टरने वाढ झाली. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा ठाकला आहे.  

तालुक्यात ज्ञानेश्वर व मुळा असे दोन साखर कारखाने असून यंदा नेवासे व शेवगाव कार्येक्षेत्र असलेल्या ज्ञानेश्वर'च्या कार्येक्षेत्रात नेवासे तालुक्यात १५ हजार  हेक्टर व मुळा सहकारी साखर कारखाना कार्येक्षेत्रात  १७ हजार १३० हेक्टर ऊस पिकाची लागवड झाली आहे.  अशी नेवासे तालुक्यात ३२ हजार १३० हेक्टर उसाची लागवड आहे.

गतवर्षी तालुक्यात साडेचार हजार हेक्टर उसाची लागवड होती. दरम्यान ज्ञानेश्वरचे कार्येक्षेत्रात असलेल्या शेवगाव तालुक्यात ११ हजार ५०० हेक्टर  उसाची लागवड झाली आहे.   दोन्ही तालुके मिळून ज्ञानेश्वर'च्या कार्यक्षेत्रात २६ हजार ५०० हेक्टर उसाची लागवड आहे. 

तालुक्यात ज्ञानेश्वर व मुळा असे दोन साखर कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप हंगाम करीत आहे. सन २०१८-१९ व २०१९-२० मध्ये नेवासे तालुक्यात सरासरी पेक्ष्या पर्जन्यमान जास्त झाल्याने ऊस पीक क्षेत्रात वाढ झाली असून हेक्टरी सरासरी ऊस उत्पादना मध्ये वाढ झाल्यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न उभा राहिला आहे.

अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असला तरी  तालुक्यातून जिल्ह्यातील इतरत्र तालुक्यातील  साखर कारखान्यांकडेही ऊस जात आहे.  यात वाहतुकीसाठी जादा खर्च होत असल्याने ऊस उत्पादकांवर बोजा पडतो. तरीही यंदा पावसामुळे उसाचे उत्पन्न बऱ्यापैकी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. मे अखेरपर्यंत दोन्ही कारखान्याचे गाळाप सुरू राहण्याची शक्यता आहे. 
 

"यावर्षी ऊस पिकामध्ये २५ ते ३० टक्के पर्यंत उत्पन्न वाढल्याने आमचे कार्यक्षेत्रामधील अतिरिक्त ऊस उत्पादन लक्ष्यात घेऊन कारखाना पूर्ण क्षमतेने उपलब्ध व संपूर्ण नोंदलेल्या उसाचे गाळप करण्याचे  नियोजन आम्ही केलेले आहे.
- अनिल शेवाळे, कार्यकारी संचालक, ज्ञानेश्वर  साखर कारखाना, भेंडे , अहमदनगर

"यावर्षी उसाचे उत्पादन  समाधानकारक आहे. पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली. परिणामी उत्पादनात काही प्रमाणात वाढ झाली. यामुळे शेतकयांच्या हाती दोन जादा पैसे पडण्याची शक्यता आहे. यातून आर्थिक समाधान लाभणार आहे.  

- अर्चना म्हस्के, ऊस उत्पादक, जेऊर हैबती, ता. नेवासे
 

नेवासे तालुका साखर कारखाना व ऊस क्षेत्र दृष्टीक्षेपात

  • * साखर कारखाने : २
  • * यंदाचे उसाचे क्षेत्र (हेक्टर) : ३२,१३०
  • * गतवर्षीचे उसाचे क्षेत्र (हेक्टर) : ४५००
  • * आत्तापर्यंत  गाळाप ( मे. टन) : ७५,०८६ 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The area under sugarcane in Newash has increased by 27,000 hectares