नगरकरांसाठी आनंदाची बातमी; दत्तूचा संघर्ष जिंकला

आनंद गायकवाड 
Saturday, 22 August 2020

मंगळापुर सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने ध्येय व चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण केला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : मंगळापुर सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने ध्येय व चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांना यावर्षीचा केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळवला आहे. हा पुरस्कार संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारच्या वतीने विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार महाराष्ट्रीयन क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना मिळाला. तर अर्जुन पुरस्कारांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करणारा, ऑलिंपिकवीर रोइंगपटू दत्तू भोकनळ, महिला खो खो संघाची कर्णधार सारिका काळे, कुस्तीपटू राहुल आवारे या महाराष्ट्रीयन खेळाडूंनी बाजी मारली आहे. 

मंगळापूर येथील अत्यंत गरिब कुटुंबातील दत्तु भोकनळ याने गरिबीचे चटके सोसताना प्रसंगी विहीरीचे खोदकामही केले आहे. भारतीय सैन्यदलात निवड झाल्यावर त्याने रोईंग खेळावर लक्ष केंद्रीत करुन आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ध्येय गाठले. 
क्रिकेटपटू अजिंक्य राहणे हा तरुणांसाठी रोल मॉडेल आहे. खेळांमध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत.

पालकांनी मुलांवर आपली आवड न लादता त्यांना खेळू द्यावे. मुलांनी मोबाईल ऐवजी मैदानी खेळांकडे वळावे. यासाठी आपण तालुक्यात विशेष योजना राबवित आहोत. दत्तु भोकनळच्या रोईगला प्रोत्साहन देण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने त्याला मदत केलेली आहे.

या यशाबद्दल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, बाबा ओहोळ, विश्वासराव मुर्तडक, आर. एम. कातोरे, रोहिदास पवार आदींनी अभिनंदन केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjuna Award to Dattu Bhokanal of Mangalpur in Sangamner taluka