अर्णब म्हणजे भाजपपुरस्कृत ॲक्टर, रोहित पवारांचा ट्विटद्वारे टोमणा

अशोक निंबाळकर
Thursday, 5 November 2020

भाजप सरकारने आपल्याविरूद्ध आवाज उठविणाऱ्या पत्रकारांवर कारवाई केली आहे. त्यांच्या पक्षाचा अजेंडा रेटणाऱ्या अभिनेता पत्रकारावर कारवाई होत असतानाच का थयथयाट होत आहे.

नगर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामी प्रकरणावर आडून भाष्य केलं आहे. कालपासून अर्णब गोस्वामीच्या प्रकरणावर भाजपने थयथयाट सुरू केला आहे. त्यांनाही रोहित पवार यांनी पटकारलं आहे.

अर्णब गोस्वामी यांनी नाईक या वास्तूविशारदाचे पैसे थकवले होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.मात्र, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास उशिर लावला. किंवा अर्णबवर कारवाई केली नाही. त्यामुळे नाईक यांच्या मुलीने तसेच आईने याबाबत विविध आरोप केले आहेत.

अर्णब यांना अटक केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनी ही लोकशाहीची आणि पत्रकारितेची हत्या केल्याची टीका केली आहे. काहीजण दाखला देत आहेत. पत्रकारितेची मूल्य तुडवल्याचाही आरोप सुरू आहे.

सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करताना,द वायर, NDTV, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना आणीबाणी आठवत नाही.पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या अभिनेत्यावर कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं.

भाजप सरकारने आपल्याविरूद्ध आवाज उठविणाऱ्या पत्रकारांवर कारवाई केली आहे. त्यांच्या पक्षाचा अजेंडा रेटणाऱ्या अभिनेता पत्रकारावर कारवाई होत असताना आताच त्यांना का आणीबाणी वाटते आहे, असा टोला रोहित पवार यांनी ट्विटद्वारे मारला आहे. अर्णबचे नाव न घेता त्याला अभिनेता संबोधले आहे. 

याबाबत त्यांनी काल दिवसभरात दोन ट्विट केली आहेत. दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, केंद्र सरकारने पत्रकारांचे हक्का हिरावणारे कायदे केले. त्यामुळे भाजपचा हा दुटप्पीपणा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arnab Goswami is a BJP sponsored actor says Rohit Pawar