नगर, मराठवाड्यात पिकणाऱ्या सीताफळाची उत्तर भारत, गुजरातच्या ग्राहकांना भुरळ

सतिश वैजापुरकर
Wednesday, 4 November 2020

नगर व मराठवाड्यात पिकणाऱ्या सीताफळांच्या स्वादाने उत्तर भारत व गुजरातेतील ग्राहकांना भुरळ घालायला सुरवात केली.

राहाता (अहमदनगर) : नगर व मराठवाड्यात पिकणाऱ्या सीताफळांच्या स्वादाने उत्तर भारत व गुजरातेतील ग्राहकांना भुरळ घालायला सुरवात केली. येथून डाळिंबासोबत नमुनादाखल खरेदी करून तेथील बाजारपेठेत पाठविलेल्या सीताफळांना मोठी मागणी आहे. त्यामुळे येथील बाजार समितीत सीताफळांचा मोंढा सुरू झाला. पहिल्याच दिवशी अडीचशे क्रेट आवक झाली. चांगल्या प्रतीच्या सीताफळांना प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दर मिळाला. यातून तीन लाखांची उलाढाल झाली.

डाळिंब व्यापाऱ्यांनीच पुढाकार घेतला व सीताफळांची खरेदी सुरू केली. याबाबत माहिती देताना बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर म्हणाले, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून सीताफळांचा मोंढा सुरू केला. पारनेर, पाथर्डी, दक्षिण नगरचा काही भाग व जिल्ह्यातील शेतकरी बाजार समितीच्या मोंढ्यावर सीताफळे विक्रीसाठी घेऊन येतात. डाळिंब व्यापाऱ्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी येथून खरेदी केलेल्या डाळिंबांसोबत सीताफळेही खरेदी केली. गुजरात व उत्तर भारतात ती डाळिंबांसोबत पाठविली. 

तेथील बाजारपेठेत त्यांना चांगली मागणी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आम्हाला सीताफळांचा मोंढा सुरू करण्याचे सुचविले. सभापती भाऊसाहेब जेजूरकर व उपसभापती बाळासाहेब जपे उपस्थित होते. सुपर गोल्डन या सुधारित जातीची सीताफळे सध्या बाजारात सहज नजरेस पडतात. झाडावरून तोडल्यापासून ही फळे आठ ते दहा दिवस टिकतात.

सुपर गोल्डन ही सीताफळाची जात सध्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. चवीला गोड, अधिक गर आणि मोठ्या आकारामुळे ग्राहकांना हे फळ आकर्षित करते. जिल्ह्यात या जातीच्या लागवडीखालील क्षेत्रात दर वर्षी वाढ होते. एकरी दोन ते तीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळविणारे सीताफळउत्पादक शेतकरी नगर जिल्ह्यात आहेत. 
- मधुकर बोठे, निवृत्त तालुका कृषी अधिकारी 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrival of 250 crates of custard apple in Rahata taluka