गहू बियाण्याची कृत्रिम टंचाई... व्यापारी, कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट 

मार्तंड बुचुडे
Monday, 9 November 2020

तालुक्‍यात रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. कांदा, गहू व हरभरा यांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, अतिवृष्टीने कांदारोपे खराब झाली. पुढे बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला. आता गहू बियाण्याची कृत्रिम टंचाई व्यापारी व कंपन्यांनी केली आहे. परिणामी, चढ्या भावाने गहू बियाणे खरेदी करावे लागत असून, शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. 

पारनेर: तालुक्‍यात रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. कांदा, गहू व हरभरा यांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, अतिवृष्टीने कांदारोपे खराब झाली. पुढे बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला. आता गहू बियाण्याची कृत्रिम टंचाई व्यापारी व कंपन्यांनी केली आहे. परिणामी, चढ्या भावाने गहू बियाणे खरेदी करावे लागत असून, शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. 

तालुक्‍यात यंदा चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी रब्बी पिकांकडे वळले आहेत. मात्र, सुरवातीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदारोपे सडली. नंतर ती तयार करण्यासाठी बियाणे मिळेना. कांदारोपे व बियाण्यांची टंचाई निर्माण झाल्याने त्याची अवाजवी दराने व्यापाऱ्यांनी विक्री केली. साधारण हजार ते दीड हजार रुपये किलो दराने मिळणारे कांदा बियाणे थेट चार हजार रुपये किलोवर गेले. काही ठिकाणी बोगस बियाणेही विकले गेले. 

आता अशीच स्थिती गहू बियाण्याबाबत आहे. तालुक्‍यासह जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गहू बियाण्याची टंचाई जाणवत आहे. ठरावीक वाण मिळेनासे झाले आहेत. "महिको 70-70' या वाणाची अनेक व्यापाऱ्यांनी सुमारे तीन-चार महिन्यांपूर्वी अनामत रकमा भरून नोंदणी केली होती. मात्र, त्यांना नोंदणीच्या पाच टक्केही माल मिळाला नाही. तीच स्थिती "माणिक्‍य' बियाण्याच्या सरबती वाणाची आहे. असे अनेक वाण शेतकऱ्यांना सध्या मिळत नाहीत किंवा वाजवीपेक्षा अधिक दराने घ्यावे लागत आहेत. गहू बियाणे अधिक किमतीला घ्यावे लागत आहे. कंपनी व वितरकांनी जाणीवपूर्वक बियाणे बाजारात कमी प्रमाणात आणले आणून कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे. 

मागणी असलेल्या वाणांची टंचाई 

सध्या गव्हाचे बहुतेक वाण मध्य प्रदेश व गुजरातमधील आहेत. मात्र, ज्या वाणाला मागणी आहे, त्याची टंचाई जाणवत आहे किंवा तो वाण मिळतच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial wheat seeds shortage in Parner taluka by seed sellers