अवैध व्यावसायिकांची उठबस व हस्तक्षेप कमी होऊन पोलिसांविषयी विश्वास निर्माण व्हावा

दत्ता उकीरडे
Saturday, 12 December 2020

राशीन पोलिस दुरक्षेत्रावर अवैध व्यावसायिकांची असलेली उठबस आणि त्यांचा कोणत्याही प्रकरणात होत असलेला हस्तक्षेप यापुढे थांबावा.

राशीन (अहमदनगर) : राशीन पोलिस दुरक्षेत्रावर अवैध व्यावसायिकांची असलेली उठबस आणि त्यांचा कोणत्याही प्रकरणात होत असलेला हस्तक्षेप यापुढे थांबावा. सामान्य माणसाला न्याय मिळून पोलिसांविषयी विश्वास निर्माण व्हावा, असे आवाहन राशीनचे उपसरपंच शंकर देशमुख यांनी केले. 

राशीन ग्रामपंचायतीच्या सभागृहात नूतन सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांचे ग्रामपंचायतीतर्फे स्वागत करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच निलम साळवे या होत्या. कार्यक्रमास भीमराव साळवे, स्वप्नील मोढळे, अमोल जाधव, अतुल साळवे, संतोष ढावरे, राजू शेख, दयानंद आढाव, श्रीकांत साळवे, राम कानगुडे उपस्थित होते. 

यावेळी देशमुख म्हणाले, पोलिस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची बैठक दुरक्षेत्रापेक्षा खासगी ठिकाणी नसावी, परिसरातुन दुरक्षेत्रावर येणाऱ्या तक्रारिंची माहिती तथाकथित स्थानिक पुढाऱ्यांना अथवा स्वयंघोषित समाजसेवकांपर्यंत तातडीने पोहचते.  हीच मंडळी अनेक प्रकरणात दबाव आणतात. प्रसंगी संबंधीतांकडून आर्थिक फायदा करून घेत अनेक गुन्हे दडपण्यात येतात. त्यामुळे लोक पोलिसांपेक्षा मध्यस्थी करणाऱ्यांकडेच न्याय मागायला जातात. दारू विक्रेते, वाळू तस्कर यांचा दूरक्षेत्रातील राबता आणि पाहुणचार बंद करावा, असेही देशमुख म्हणाले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना दिवटे म्हणाले, आपण विविध भागात काम केले आहे. त्याचा अनुभव माझ्या गाठीशी असून सर्वसामान्य माणसाला पोलिसांविषयी विश्वास वाटेल असेच कामकाज आपल्या काळात होईल, अशी ग्वाही देत केलेल्या सत्काराबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant Inspector of Police Somnath Divate felicitated at Rashin