
Ahmednagar News : राजकीय वादातून पदाधिकाऱ्यावर हल्ला
संगमनेर : साकूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या गटाचे समर्थन केल्याबद्दल विरोधी गटातील जमावाने ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करून त्यांच्यासह महिलांना लथाबुक्क्यांनी मारहाण करत विनयभंग केला.
याप्रकरणी निवृत्त कृषी अधिकाऱ्यासह सतरा जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा घारगाव पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत साकूरमधील एका ३० वर्षीय महिलेने घारगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार उपसरपंच शंकर खेमनर व इंद्रजित खेमनर यांचे समर्थन करण्यासाठी व त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांबाबत निवेदन देण्यासाठी मंगळवारी साकूर ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली काही नागरिक व महिलांनी संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
बुधवारी (ता. ४) सायंकाळी साडेसात वाजता सरपंचाच्या वस्तीवरील फिर्यादीसह अन्य महिलांना माजी निवृत्त कृषी अधिकारी सुभाष खेमनर, बुवाजी खेमनर, किशोर खेमनर, इसहाक पटेल, विश्वजित खेमनर, बबलू ऊर्फ आदिक शेंडगे व सद्दाम चौगुले (सर्व रा. साकूर) यांच्यासह अन्य नऊ ते दहा अनोळखी व्यक्तींनी अपशब्द वापरीत शिवीगाळ व दमबाजी केली. मध्यस्थी करणाऱ्या पदाधिकाऱ्यास व अन्य लोकांनाही जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली.
वाद नको म्हणून घरात गेलेल्या महिला व पदाधिकाऱ्यासह इतर पुरुषांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुरुवारी घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी सात निष्पन्न आरोपींसह अज्ञात दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव करीत आहेत.