लष्कराच्या नगरमधील स्थळाच्या स्थलांतराच्या हालचाली, कर्मचारी सैरभैर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

"व्हीआरडीई' हलविण्याचे वरिष्ठ पातळीवरून दिलेले संकेत नगरकरांसाठी हानिकारक ठरतील. यात नगरमधून मोठा रोजगार स्थलांतरित होईल. नगरच्या औद्योगिक विकासाला खीळ बसेल.

नगर : संरक्षण विभागाच्या "डीआरडीओ'अंतर्गत (संरक्षण संशोधन आणि विकास आस्थापना) कार्यरत असलेल्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेच्या (व्हीआरडीई) स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्याने त्यास विरोध करण्यात यावा, यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांना निवेदन दिले. 

या वेळी "व्हीआरडीई बचाव'चे कार्यकर्ते डी. डी. गाडेकर, एस. व्ही. वर्पे, एस. एस. बनकर, ए. एम. जाधव, पी. जी. गवळी, बी. आर. बिने, एस. के. मेश्राम, के. बी. करोशिया आदी उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे, की सैन्यदलाला लागणारी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे बनविण्यात नगरच्या "व्हीआरडीई'ची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. यामध्ये वैज्ञानिक, अधिकारी व कर्मचारी, कामगार, असे जवळपास एक हजार जण कार्यरत आहेत. त्यातून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. 

हेही वाचा - विधवा भावजयीसोबत दिराने बांधली लग्नगाठ

"व्हीआरडीई' हलविण्याचे वरिष्ठ पातळीवरून दिलेले संकेत नगरकरांसाठी हानिकारक ठरतील. यात नगरमधून मोठा रोजगार स्थलांतरित होईल. नगरच्या औद्योगिक विकासाला खीळ बसेल. स्थानिक व्यावसायिकांना फटका बसेल, त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांवरही परिणाम होईल. नगरचे आर्थिक, सामाजिक व मानसिक नुकसान थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवेदनात केले आहे. 

संभाजी कदम म्हणाले, ""शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे केंद्रीय संरक्षण समिती सदस्य असल्याने, त्यांच्याशी माझे याबाबत बोलणे झाले आहे. त्यांनी "व्हीआरडीई'चे शिष्टमंडळ भेटीसाठी बोलाविले असल्याने, लवकरच याबाबत तोडगा निघेल.'' 

दरम्यान, "व्हीआरडीई'च्या कर्मचाऱ्यांच्या अन्य एका शिष्टमंडळाने "डीजी' पी. के. मेहता यांच्याबरोबर झालेल्या बैठकीचा संदर्भ देत "व्हीआरडीई'चे स्थलांतर रद्द करावे, यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांना निवेदन दिले. त्या निवेदनावर आर. बी. खरमाळे, व्ही. एम. वायकर, एस. एस. अहमद, एस. डब्ल्यू. पगारे, पी. जी. पराशर, आर. एल. स्वामी आदींच्या सह्या आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to relocate VRDE in Ahmednagar