धक्कादायक! कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न; ‘या’ कारागृहात महिन्यातील हा चौथा प्रकार 

विलास कुलकर्णी
Wednesday, 15 July 2020

राहुरी कारागृहात मंगळवारी (ता. १४) रात्री साडेदहा वाजता एका कैद्याने अंगाच्या जखमांना लावण्याचे औषधी प्राशन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला रात्री ११ वाजता तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्रभर त्याच्यावर उपचार करून बुधवारी (ता. १५) सकाळी साडेदहा वाजता त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. तीन महिन्यात राहुरी कारागृहातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे, कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी कारागृहात मंगळवारी (ता. १४) रात्री साडेदहा वाजता एका कैद्याने अंगाच्या जखमांना लावण्याचे औषधी प्राशन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला रात्री ११ वाजता तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्रभर त्याच्यावर उपचार करून बुधवारी (ता. १५) सकाळी साडेदहा वाजता त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. तीन महिन्यात राहुरी कारागृहातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे, कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अल्लाउद्दीन इब्राहीम शेख (वय २६, रा. कोल्हार) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कैद्याचे नाव आहे. तो दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील कैदी आहे. कारागृहातील कैद्यांना सतत झोपून अंगाला जखमा होतात. त्यामुळे, त्यांना जखमा बर्‍या होण्यासाठी औषध दिले जाते. हे औषध प्राशन करुन कैदी शेख याने आत्महत्येचा प्रयत्न केला.  कारागृह सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना वेळीच समजल्याने, त्याला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यापूर्वी कैद्यांना भोजन देणाऱ्या ठेकेदाराच्या माणसाकडून कैद्यांना मिरचीपूड पाकीट देण्याचा प्रकार घडला होता.  नंतर दोन कैद्यांमध्ये कारागृहात बेदम मारामारीचा प्रकार घडला. त्यात एका कैद्याचे दोन दात पडले. त्याच्यावर राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार केले होते. त्यानंतर एका ७८ वर्षाच्या कैद्याने चमच्याच्या दांड्याने पोट फाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आजच्या घटनेविषयी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. 

चौकशीचा ससेमिरा...!
पोलिस निरीक्षक यांची नाराजी असलेल्या विशिष्ट सात- आठ पोलिस कर्मचाऱ्यांनाच वारंवार कारागृहाच्या सुरक्षेची ड्युटी दिली जाते. मर्जीतील कर्मचाऱ्यांना कारागृह सुरक्षेसाठी कधीच नेमले जात नाही. कारागृहात कैद्यांच्या बाबत कोणतीही घटना घडली. तर, याच खप्पा मर्जी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना चौकशीला सामोरे जावे लागते. मागील घटनेत वृद्ध कैद्याने पोट फाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा, कारागृहाच्या सुरक्षेतील एक महिला पोलिस कर्मचारी आठ दिवस आजारी पडल्या होत्या. विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच कारागृहाची ड्युटी असल्याने त्यांना मानसिक त्रासाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. अशी चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempted suicide at Rahuri Jail in Ahmednagar district