समुदाय आरोग्यधिकारी प्रवेश पूर्व परीक्षेला 421 जणांची हजेरी 

दौलत झावरे
Saturday, 17 October 2020

राज्यातील रिक्त असलेल्या समुदाय आरोग्यधिकाऱ्यांची प्रवेश पूर्व परीक्षा शहरातील दोन परीक्षा केंद्रावर 514 परीक्षार्थ्यांपैकी 421 जणांनी परीक्षा दिली.

नगर : राज्यातील रिक्त असलेल्या समुदाय आरोग्यधिकाऱ्यांची प्रवेश पूर्व परीक्षा शहरातील दोन परीक्षा केंद्रावर 514 परीक्षार्थ्यांपैकी 421 जणांनी परीक्षा दिली. 93 जण अनुपस्थित होते, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. 

राज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी पदे रिक्त आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने रिक्त असलेली ही पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या परीक्षेसाठी नगर शहरातील अशोकभाऊ फिरोदिया व रुपीबाई बोरा विद्यालयात झाली. या परीक्षेसाठी राज्यस्तरीय पर्यवेक्षक व निरीक्षक नगरमध्ये आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत पार पडली.

प्रत्येक परीक्षार्थीमध्ये सामाईक अंतर राखण्याचे नियोजन करण्यात आल्यामुळे 514 जणांना परीक्षेसाठी बसण्याची 43 हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. तसेच प्रत्येक परीक्षार्थीला मास्कचा वापर सक्तीचे करण्यात आले होते. तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर परीक्षार्थींसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना सोडण्याच्या अगोदर त्यांच्या तापमानाची तपासणी केली जात होती. 

केंद्रप्रमुख म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील तुंभारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परीक्षा सुरळीत पार पाडली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attendance of 421 candidates for Community Health Officer Entrance Examination