पहिल्याच दिवशी शाळेत ८८ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या 19 पथकांनी 50 शाळांना भेटी देऊन आढावा घेतला.

नगर ः राज्य सरकारच्या निर्देशांनुसार आजपासून जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग भरविण्यास सुरवात झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दोन हजार 27 शाळांत सुमारे 88 हजार 456 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्वच शाळांचा आढावा घेतला.

या वेळी सर्व शाळांना शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता मोहीम राबवून सर्व वर्गखोल्या सॅनिटाइझ करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर स्वतः प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन माहिती घेत पाहणी केली. त्यानंतर जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना तपासणीचे नियोजन केले.

हेही वाचा - सुजय विखे पाटील घेणार शरद पवार यांची भेट

हे नियोजन करताना नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करताना झालेला गोंधळ लक्षात घेत, रोज जिल्ह्यातील पाचशे शिक्षकांच्या तपासण्या करण्याचे नियोजन केले. त्यामुळे पाच हजार सात शिक्षकांच्या तपासण्या शाळा सुरू होण्याच्या दिवसापर्यंत पूर्ण झाल्या. 

आज पहिल्या दिवशी दोन हजार 27 शाळांत तीन लाख 825 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील एक हजार 759 शाळा पहिल्याच दिवशी सुरू झाल्या. दिवसभरात 88 हजार 456 विद्यार्थ्यांनी धडे गिरवले.

मुलांना शाळेत पाठविण्यासंदर्भात सुमारे 91 हजार 848 पालकांनी संमतिपत्रे सादर भरून दिली आहेत. शिक्षण विभागाच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. 

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या साडेसहा हजार शिक्षकांपैकी एकूण पाच हजार सात शिक्षकांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 14 जण बाधित आढळून आले आहेत. 

माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या 19 पथकांनी 50 शाळांना भेटी देऊन आढावा घेतला. यामध्ये माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांचा समावेश होता. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attendance of 88,000 students on the first day of school