सोनईत छात्र सैनिकांकडून स्वच्छतेचा जागर! जनजागृती फेरीसह विविध उपक्रम

सुनील गर्जे 
Sunday, 20 December 2020

१७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता पंधरवाड्या अंतर्गत सोनई गावात स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली.

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यातील सोनई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता पंधरवाड्या अंतर्गत सोनई गावात स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. दरम्यान या पंधरवड्यात सोनई गावासह परिसरात स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्वच्छता जनजागृती फेरीचा शुभारंभ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे व एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन प्रा. डॉ. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरवड्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे नेतृत्व, सिनिअर अंडर ऑफीसर वैभव वराळे, योगेश काळे, स्वप्नील जावळे, शुभांगी बानकर,निकिता डेरे हे करत आहेत.

एनसीसीच्या ७२ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एनसीसीच्या १७ महाराष्ट्र बटालियनच्या क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयातील छात्रसैनिक स्वच्छता उपक्रमात भाग घेत आहेत. परिसरातील पानवठे, तळे,  नदीपात्र यांची स्वच्छता करीत आहेत. याशिवाय चित्रकला, निबंध, रांगोळी, घोषवाक्य स्पर्धा तसेच पथनाट्य व रेलीच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर छात्रसैनिक समाजात करीत आहेत.

या मोहिमे अंतर्गत सोनई येथे काढण्यात आलेल्या फेरी दरम्यान एनसीसी छात्रांनी ग्रामस्थांत स्वच्छेतेविषयी महत्त्व पटवून देत सांडपाण्याची व्यवस्था कशी करावी, आरोग्याच्या दृष्टीने पाण्याच्या टाक्या किती दिवसांनी स्वच्छ कराव्यात याविषयी  जागृत केले. बटालियनचे कमांडिंग ऑफीसर कर्नल जीवन झेंडे, अॅडमी ऑफीसर कर्नल बाली, सुभेदार मेजर पी. व्यंकटेश यांनी या उपक्रमातचे  कौतुक केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness of cleanliness from student soldiers in Sonai