esakal | Nagar : पाचपुतेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar : पाचपुतेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Nagar : पाचपुतेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : शहरातील ग्रामीण रुग्णालयात बसविलेल्या ऑक्सिजन प्लँटचे उद्‌घाटन केल्यानंतर तेथील कोनशिलेवर, उपस्थित नसणाऱ्या मंत्र्यांची नावे वरच्या बाजूला आणि आमदार बबनराव पाचपुतेंचे नाव खाली टाकल्याने चांगलाच गोंधळ झाला. विशेष म्हणजे, हा प्लँट पाचपुतेंच्या विकासनिधीतून असतानाही हा दुजाभाव झाल्याने, संतापलेल्या पाचपुतेंनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरच अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

या अधिकाऱ्यांविरुद्ध विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज ग्रामीण रुग्णालयातील प्राणवायू निर्मिती संयंत्राचे उद्‌घाटन झाले. त्यासाठी आमदार पाचपुते यांनी निधी दिला. मात्र, या कार्यक्रमाच्या कोनशिलेवर पाचपुतेंचे नाव खालच्या बाजूला टाकले. जिल्ह्यातील एकही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. मात्र, कोनशिलेवर त्यांची नावे वरच्या बाजूला घेण्यात आल्याने पाचपुते चांगलेच वैतागले. तेथे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पाचपुतेंनी संताप व्यक्त केला.

‘‘चाळीस वर्षे झाली राजकारण करतोय. सात वेळा आमदार राहिलो आणि अशा पद्धतीने आम्हाला वागणूक देता का? माझ्या निधीतून काम केले आणि जे उपस्थित नव्हते त्यांची नावे वरच्या बाजूला आणि माझे खाली टाकले. हा ‘प्रोटोकॉल’ आहे का,’’ असा सवाल त्यांनी केला. पालकमंत्री मुश्रीफ पाचपुते यांना समजावून सांगत होते. मात्र, ‘यात तुमचा दोष नाही. अधिकाऱ्यांना हे समजत नाही का? हे त्यांचे काम आहे,’ असे सांगत पाचपुतेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांनी, ‘पत्रिका ज्या पद्धतीने आली, त्याच पद्धतीने आम्ही नावे टाकली आहेत. पत्रिकेत नाव वरच्या बाजूला आहे. मात्र, कोनशिला तयार केली त्यावर खालच्या बाजूला कसे गेले हे माहिती नाही,’ असे सांगितले.

चाळीस वर्षे राजकारण करतोय, पण यापूर्वी असे घडले नाही. हे जाणीवपूर्वक केले गेले आहे. जे कोणी हे केले आहे, त्या अधिकाऱ्यांविरुद्ध आपण विधानसभेत हक्कभंग दाखल करणार आहोत.

- बबनराव पाचपुते, आमदार

loading image
go to top