पाऊस थांबला तरी पाणी जाण्यास वाव नसल्याने घराभोवती साचले तळे

सचिन सातपुते
Monday, 2 November 2020

मुलभूत सुविधांपासून वंचीत असलेल्या माऊली नगर या शहराच्या रहिवाशी भागात पावसाने रस्ते अक्षरशः पाण्यात बुडाले.

शेवगाव (अहमदनगर) : मुलभूत सुविधांपासून वंचीत असलेल्या माऊली नगर या शहराच्या रहिवाशी भागात पावसाने रस्ते अक्षरशः पाण्यात बुडाले. गटार, पाणी व वीज या सुविधां उपलब्ध नसल्याने नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

शेवगाव- मिरी रस्त्यालगत शहरातील इरिगेशन कॉलनी शेजारी माऊलीनगर वसाहत आहे. 10 ते 12 वर्षांपासून या भागात अदयापही पक्के रस्ते झालेले नाहीत. तसेच ड्रेनेज, वीज व पिण्याचे पाणी या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. येथील रस्ते माती- मुरूमांचे असल्याने पावसाळ्यात हे रस्ते अत्यंत चिखलमय, निसरडे होऊन जातात. पाऊस थांबून अनेक दिवस उलटले तरी पाणी जाण्यास वाव नसल्याने घराभोवती साचलेले तळे त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी त्यावर उत्पन्न होणारे डास यामुळे परिसरातील रहिवाशी वैतागले आहेत. दुचाकी किंवा अन्य वाहने घराबाहेर काढून मिरी रस्त्यापर्यंत आणण्यासाठी मोठी यातायात करावी लागते. 

विदयानगर व अन्य परिसरातील सांडपाणी इरिगेशन कॉलनीजवळ सोडण्यात आले आहे. ते पाणी माऊलीनगरच्या शेजारी असलेल्या मिरी रस्त्यालगत साठते. डेंग्यू, मलेरिया वा अन्य आजारांची साथ वाढण्याचा धोका तयार झाला आहे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्ववरून हे सांडपाणी जात असल्याचे नागरिकांचे म्हणने असून त्यातून पिण्याचे पाणी दुषित होऊन कॉलरा, गॅस्ट्रो असे आजार वाढण्याचा धोका संभावतो.

विदयानगरमधून येणारे व साठून राहणारे सांडपाणी माऊलीगर परिसरातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या नळ्या टाकाव्यात, माऊलीगनर भागातही गटारी व सांडपाणी वहनाची व्यवस्था करावी, महावितरणशी संपर्क साधून ठिकठिकाणी पोल टाकावेत व दिवाबत्तीची सोय करावी, अशा मागण्या नागरिकांनी नगरपरिषदेकडे केल्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad condition of roads in Mauli Nagar in Shevgaon taluka