esakal | पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे भाग्य काही उजळेना; पालखी मार्गाची अवस्था बिकट
sakal

बोलून बातमी शोधा

Bad road condition of Paithan-Pandharpur National Highway

पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे भाग्य काही उजळेना

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

बोधेगाव (जि. अहमदनगर) : शेवगाव तालुक्याच्या हद्दीतून बोधेगावमार्गे जाणाऱ्या पैठण- पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम भूसंपादनाअभावी तब्बल तीन वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याची रखडलेली अर्धवट कामे व खड्ड्यांमुळे सध्या या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे या पालखी मार्गाचे भाग्य उजळणार तरी केव्हा, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

खराब रस्त्याचा वाहनधारकांना मनस्ताप

पैठण-पंढरपूर हा संत एकनाथ महाराज यांची पालखी जाणारा मार्ग असल्याने पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. हा मार्ग तालुक्यातील मुंगी, हातगाव, बोधेगाव, लाडजळगाव, शेकटे खुर्द आदी गावांच्या हद्दीतून जातो. या मार्गाला ७५२-ई म्हणून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. भूसंपादनाअभावी या रस्त्याचे काम साधारणपणे तीन वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींची रीतसर मोजणी व योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. याची दखल घेऊन प्रशासनाने रस्त्याचे काम बंद ठेवले आहे.

काही काम झाले असून, काही अर्धवट आहे. त्यातच, रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमध वेड्या बाभळी उगवल्या असून, त्या वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या खराब रस्त्याचा वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: 'उपमुख्यमंत्री आम्हाला साथ देत नाहीत'

तात्पुरत्या स्वरूपात तरी खड्डे बुजवावे

''शेवगाव तालुक्याच्या हद्दीतील पैठण-पंढरपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सध्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाटसरूंना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अनेकदा अपघात होतात. यामुळे प्रशासनाने किमान मुरूम-मातीने खड्डे तात्पुरते बुजवून रहदारीयोग्य तरी रस्ता करावा.'' - नीलेश ढाकणे, ग्रामस्थ, हातगाव

''शेवगाव तालुक्याच्या हद्दीतील महामार्गावरील दुरुस्तीच्या कामाबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. दोन-तीन दिवसांत गाळ काढणे, मुरूम-खडी टाकणे आदी दुरुस्ती कामे पूर्ण केली जातील.'' - सूर्यकांत गलांडे, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग, औरंगाबाद विभाग

हेही वाचा: ‘पुन्हा ठणकावून सांगते, मी भ्रष्टाचार केला नाही’ - देवरे

loading image
go to top