Ahmednagar :जिल्हा शल्यचिकित्सकांना अटकपूर्व जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court

जिल्हा शल्यचिकित्सकांना अटकपूर्व जामीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचा अहमदनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर. नातू यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (ता. ६) अतिदक्षता विभागाला आग लागली. या भागात १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर सहा रुग्ण वाचविण्यात यश आले. नाशिक विभागीय महसूल आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून या आगीची चौकशी सुरू आहे. अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रिजवान अहमद मुजावर यांच्या फिर्यादीवरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. मिटके यांनी या गुन्ह्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंता यांना अटक केली आहे. या चौघींचा नियमित जामीन अर्ज ही न्यायालयाने फेटाळलेला आहे. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. डॉ. पोखरणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी सरकार पक्षाला म्हणणे सादर करण्याची नोटिस काढली आहे. या अर्जावर पुढील सुनावणी ता. १७ रोजी होणार आहे. डॉ. पोखरणा यांच्या वतीने ॲड. प्रतीक कोठारी व ॲड. नंदिनी कोठारी यांनी काम पाहिले.

सहआरोपी करण्याची मागणी

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांना आरोपी करावे, अशी मागणी काही स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही डॉ. पोखरणा यांना या गुन्ह्यात सहआरोपी करावे, असे भूमिका स्पष्ट केली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज अंतरिम मंजूर केला आहे.

loading image
go to top