इंदोरीकर महाराजांचे "ते' वक्तव्य अपप्रचारासाठी नाही : गायकर 

शांताराम काळे 
Monday, 27 July 2020

निवृत्ती महाराज देशमुख हे हिंदू धर्मातील उत्तम प्रबोधनकार आहेत. अनेकांचे उद्धवस्त झालेले संसार त्यांच्या प्रबोधनामुळे सुरळीत झाले आहेत.

अकोले (अहमदनगर) : निवृत्ती महाराज देशमुख हे हिंदू धर्मातील उत्तम प्रबोधनकार आहेत. अनेकांचे उद्धवस्त झालेले संसार त्यांच्या प्रबोधनामुळे सुरळीत झाले आहेत.

25 वर्षे कीर्तनातून ते प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या प्रबोधनाचा अनेकांना फायदा झालेला आहे. त्यांच्या प्रबोधनामध्ये हिंदू ग्रंथ पुराणाचा संदर्भ असतो. त्याच अनुषंगाने त्यांनी सम विषम तारखेबद्दल आपले प्रबोधन केलेले आहे. त्यांचा त्यामागे समाजात कोणताही अपप्रचार करण्याचा हेतू नव्हता. त्यांचे सामाजिक कार्य सर्व राज्यात सर्वश्रुत आहे. 

हिंदू धर्मांची वाढती लोकप्रियता ही हिंदू धर्म विरोधकांना खपत नाही त्यामुळे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून समाजात हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या साधुसंतांना त्रास देण्याचे षड्यंत्र काही मंडळीनी चालवले आहे अशा प्रवृत्तीचा बिमोड केल्याशिवाय बजरंग दल स्वस्थ बसणार नाही. इतर धर्मातील अनिष्ठ रूढी व परंपरा याविरुद्ध कार्यवाही करावी किंवा हिंदू धर्माला बदनाम करण्याचे उद्योग त्वरित थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय बजरंगदल स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रिय मंत्री शंकर गायकर यांनी दिला. ते अकोले येथे पत्रकारांशी बोलत होते. 

सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून राज्यभर गदारोळ उठला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

इंदोरीकर महाराजांनी याप्रकरणी खुलासाही केला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या मागणीवर पुरोगामी संघटना ठाम होत्या. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांना कोर्टाच्या फेऱ्याही कराव्या लागणार आहेत. या आधीही अनेक राजकीय नेत्यांनी व विविध सामाजिक संघटना व संप्रदायांनी इंदोरीकर महाराजांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, महाराज कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर संपूर्ण देशभर पसरलेल्या व आक्रमक हिंदुत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे नेते शंकर गायकर यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतल्यामुळं वेगळीच चर्चा रंगली असून व या पुढील लढाई हिंदुत्व वादी संघटना विरुद्ध पुरोगामी अशी रंगण्याची चिन्हे आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajrangdal Shankar Gaikar of meet Indurikar Maharaj