अहमदनगर : अत्यल्प मनुष्यबळ, दरमहा ३०० प्रसूती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Deshpande Hospital

अहमदनगर : अत्यल्प मनुष्यबळ, दरमहा ३०० प्रसूती

अहमदनगर - महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील मनुष्यबळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. रुग्णालयात प्रत्येक महिन्यात तब्बल ३०० ते ३२५ महिलांची प्रसूती होते. त्यात किमान ४० सिझेरिन (शस्त्रक्रिया) होतात; परंतु रुग्णालयात केवळ दोनच पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. परिचारिका, आया तसेच इतर कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. रुग्णालयाच्या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनी देखील पाठ फिरवली आहे.

देशपांडे रुग्णालयात दररोज १० ते १५ महिला प्रसुतीसाठी दाखल होतात. शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील महिला या रुग्णालयात येतात. परंतु त्यांना सेवा देत असताना रुग्णालयातील उपलब्ध डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक सुरू आहे. शस्त्रक्रियेची वेळ आली, तर रुग्णाला भूल देण्यासाठी बाहेरून भूलतज्ञ बोलवावे लागतात. ऐनवेळी भूलतज्ज्ञ उपलब्ध न झाल्यास शस्त्रक्रिया थांबवावी लागते. रुग्णालयातील जनरल वॉर्ड व प्रायव्हेट रुममध्ये ७० ते ते ८० महिला दररोज उपचार घेतात; परंतु त्यांच्या देखरेखीसाठी अवघ्या १२ नर्स आहेत. त्यांना दररोज तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. रुग्णालयात मनुष्यबळाची अशी परिस्थिती असताना महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी मात्र वर्षानुवर्षांपासून केवळ पोकळ आश्वासने देत आहेत.

बालकांसाठी अतिदक्षता विभाग नाही

रुग्णालयात अनेकदा निकषांपेक्षा लहान असलेल्या बाळांचा जन्म होतो. अशावेळी त्यांना इन्क्युबेटर किंवा अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज असते. मात्र, रुग्णालयात ही व्यवस्थाच नाही. त्यामुळे बाळांना खाजगी रुग्णालयात ठेवावे लागते. आई देशपांडे रुग्णालयात व बाळ दुसरीकडे, अशी स्थिती कायम निर्माण होते. त्यामुळे रुग्णालयात बाळांसाठी अतिदक्षता विभाग तातडीने उभारण्याची गरज आहे.

नवीन जागेत विस्तारित रूग्णालय

देशपांडे रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळाने सात कोटी रूपयांचा निधी मंजूर केला; परंतू नुतणीकरणाऐवजी नवीन जागेत विस्तारित रुग्णालय उभारण्याचा ठराव महापालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला. त्यासाठी १७.८७ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला. जिल्हा नियोजन मंडळाने दिलेला सात कोटी रूपयांचा निधी नवीन जागेवरील विस्तारित रूग्णालयासाठी वापरण्याच्या ठरावास जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मंजुरी दिली आहे.

असे आहे मनुष्यबळ

 • स्त्रीरोगतज्ञ- २ (गरज ४)

 • पूर्णवेळ डॉक्टर- २ (गरज ५)

 • अर्धवेळ डॉक्टर- ४ (गरज ६)

 • नर्स- १२ (गरज २५)

 • आया- २५ (गरज ६०)

 • शिपाई- ३ (गरज ८)

 • स्वच्छता कर्मचारी- ३ (गरज ८)

 • ऑपरेशन थिएटर

 • डिलिव्हरी रूम- १ (७ टेबल)

 • विशेष रूम- ११

 • (प्रत्येकी ४ बेड)

 • जनरल वॉर्ड- १ (४२ बेड)

Web Title: Balasaheb Deshpande Hospital Has Very Little Manpower

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top