Ahmednagar : राजीनामा का दिला नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : राजीनामा का दिला नाही?

तळेगाव दिघे : निळवंडे धरण व कालव्यासाठी अविरतपणे प्रयत्न केल्यानेच कालव्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आता निळवंडेचे पाणी कोणीही थांबवू शकणार नाही. निळवंडेसाठी मदत केलेल्यांचा आम्ही कायम उल्लेख करतो, मात्र तुमचे निळवंडेसाठी योगदान काय? समन्यायी पाणीवाटपाविरोधात संगमनेर व अकोले संघर्ष करीत असताना, तुम्हीही विधानसभेचे सदस्य होता. मग राजीनामा का दिला नाही, असा परखड सवाल बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केला. तळेगाव दिघे येथे विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

थोरात म्हणाले, की आपल्या कार्यकाळात अनेक अडचणींवर मात करीत निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. त्यात मधुकर पिचड यांनी मोलाचे सहकार्य केले. आज श्रेय घेऊ पाहणाऱ्यांचे यामध्ये कोणतेही योगदान नाही. अकोले, संगमनेरमध्ये समन्यायी पाणी वाटपाविरोधात आंदोलन व संघर्षाच्या वेळी ते गप्प होते. त्या वेळी विधानसभेतही त्यांनी भाष्य केले नाही. सत्ता येते आणि जाते त्यामुळे दबावाचे राजकारण करू नका संगमनेर तालुका त्याला बळी पडणार नाही. सध्याचे द्वेष भावनेचे राजकारण लोक पाहत आहेत. आपल्याला मिळालेल्या पदाची किंमत ठेवा. यावेळी आमदार डॉ. तांबे, डॉ. जयश्री थोरात, मिलिंद कानवडे, महेंद्र गोडगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले. रमेश दिघे यांनी आभार मानले.

या वेळी दुर्गा तांबे, बाबा ओहोळ, शंकर खेमनर, गणपत सांगळे, अमित पंडित, अजय फटांगरे, अविनाश सोनवणे, सुभाष सांगळे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, अर्चना बालोडे, हौशीराम सोनवणे, बाळासाहेब दिघे, केरू दिघे, विठ्ठल दिघे, मच्छिंद्र दिघे उपस्थित होते.

संगमनेर बसस्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबरोबरच्या संबंधांमुळे २५ कोटी रुपये मिळाले. त्यात राज्य सरकारच्या २५ कोटींमधून हे काम सुरू आहे. मात्र काही मंडळींनी उद्घाटनाची घाई केली. उद्घाटने करायची असतील तर, गचक्यांचा रस्ता म्हणून राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या नगर-मनमाड रस्त्याची पहिली दुरुस्ती करा.

- बाळासाहेब थोरात, माजी मंत्री