सावधान! समाजाचे आर्थिक स्वास्थ्य बिघडतयं 

अमित आवारी
Wednesday, 17 June 2020

लॉकडाउनमुळे तीन महिन्यांपासून अनेकांचा रोजगार बंद आहे. शहरातील बॅंकांसमोर सोने तारण ठेवण्यासाठी व सोनेतारण कर्ज नूतनीकरणासाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.

नगर : लॉकडाउनमुळे तीन महिन्यांपासून अनेकांचा रोजगार बंद आहे. शहरातील बॅंकांसमोर सोने तारण ठेवण्यासाठी व सोनेतारण कर्ज नूतनीकरणासाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दुसरीकडे, सुवर्णपेढ्यांमध्ये ग्राहकांचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे आता समाजाचे आर्थिक स्वास्थ्य बिघडू लागल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. 

लॉकडाउनचा मोठा परिणाम नागरिकांच्या आर्थिक आरोग्यावर झाला आहे. काहींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशा स्थितीत या नागरिकांनी घरखर्चासाठी सोने तारण ठेवण्यास सुरवात केली आहे. लॉकडाउनमध्ये ग्राहकांना सोनेतारण कर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी बॅंकांत येणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे हे ग्राहक लॉकडाउन शिथिल होताच बॅंकांमध्ये गर्दी करीत आहेत. यात गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय ग्राहकांची संख्या अधिक आहे. सोन्याचे दर सतत वाढत असल्याने सोनेतारण कर्ज बॅंकांकडून सहज मिळते. ते मिळविण्याकडे ग्राहकांचा कल आहे. 

एकीकडे बॅंकांसमोर सोने तारण ठेवण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे, तर दुसरीकडे शहरातील सुवर्णपेढ्यांमध्ये ग्राहकांची वानवा आहे. कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नागरिक लग्नसमारंभ थोडक्‍यात उरकत आहेत. लॉकडाउनमध्ये सुवर्णखरेदीचे तीन मुहूर्त टळले. लग्नसराईही गेली. लग्नाचे आता केवळ दोन मुहूर्त शिल्लक आहेत. यातच लॉकडाउनमुळे सुवर्णकारागीर गावी गेले आहेत. त्यामुळे नवीन सुवर्णालंकार घडविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता फक्त दोन लग्नमुहूर्त राहिल्याने, ग्रामीण भागातील ग्राहक शहरातील सुवर्णपेढ्यांत येत आहेत. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास सुवर्णालंकारांची दरवाढ होण्याची शक्‍यता जाणकार व्यक्‍त करीत आहेत, मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुणे, मुंबई, कोलकता येथील सुवर्णबाजार खुले झाल्याने सुवर्णालंकार विक्रीची कमतरता काही प्रमाणात भरून निघण्याची आशा सुवर्ण व्यावसायिकांना आहे. 

लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीमुळे नागरिक सुवर्णालंकार मोडतील, असा अंदाज बाजारपेठेत व्यक्‍त करण्यात येत होता. मात्र, सध्या सुवर्णालंकार मोडण्यापेक्षा ते बॅंकांकडे तारण ठेवताना ग्राहक दिसून येत आहेत. 
 
बाजारपेठेत सध्या लग्नसराईचे ग्राहक आहेत; मात्र किरकोळ ग्राहक नाहीत. लग्नसराईतील ग्राहकांची संख्याही कमी आहे. गेल्या लग्नसराईच्या तुलनेत यंदा 30 टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त तोटा झाला आहे. 
- गुंजन शिंगवी, संचालक, शिंगवी ज्वेलर्स 

लॉकडाउनमुळे ग्राहक सोने तारण ठेवण्यासाठी बॅंकेत येत आहेत. यात नवीन सुवर्णतारण कर्ज व कर्जाचे नूतनीकरण करून घेणारे ग्राहक आहेत. लॉकडाउनमुळे रोजगार नसल्याने खर्चासाठी सोने तारण ठेवण्याकडेच ग्राहकांचा कल दिसून येत आहे. 
- सतीश शिंगटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर अर्बन बॅंक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful! The economic health of the society is deteriorating