नगर- सोलापूर रस्त्यावर हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करून लूटले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

नगर- सोलापूर रस्त्यावर लष्करी हद्दीतील प्रवेश करवसुली नाक्‍यावर (शुक्रवारी) रात्री हप्ता देण्यास नकार दिल्याच्या रागातून दहा जणांनी तिघांना मारहाण करीत गल्ल्यातील 46 हजारांची रोकड लंपास केली.

अहमदनगर : नगर- सोलापूर रस्त्यावर लष्करी हद्दीतील प्रवेश करवसुली नाक्‍यावर (शुक्रवारी) रात्री हप्ता देण्यास नकार दिल्याच्या रागातून दहा जणांनी तिघांना मारहाण करीत गल्ल्यातील 46 हजारांची रोकड लंपास केली. 

याबाबत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी एकास अटक केली आहे. संदीप ऊर्फ म्हम्या शरद शिंदे (रा. बुरुडगाव रस्ता), असे त्याचे नाव आहे. विक्रम गायकवाड, बाबा आढाव (दोघेही रा. वाळुंज पारगाव, ता. नगर), संदीप वाकचौरे (रा. दरेवाडी, ता. नगर), प्रकाश कांबळे (पूर्ण नाव समजले नाही) यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीत अजय सुगंध शिंदे, हनुमंत प्रकाश देशमुख व सचिन तुकाराम पवार जखमी झाले. 

याबाबत अजय शिंदे यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नगर-सोलापूर रस्त्यावरील छावणी परिषदेतील नाक्‍यावर काल रात्री मोटार व दुचाकीवर वरील आरोपी आले. विक्रम गायकवाड व बाबा आढाव यांनी हत्याराचा धाक दाखवत सुपरवायझर सचिन पवार यांना, "आम्हाला दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल,' असे सांगितले. त्यावर पवार यांनी, व्यवस्थापक मधुकर बागायत यांच्याशी बोला, असे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी सचिन यांना धक्काबुक्की करीत, रस्त्याच्या बाजूला नेऊन मारहाण केली. 

नाक्‍यावरील कर्मचारी वाद मिटविण्यासाठी धावले असता, आरोपी बाबा आढाव याने कोयत्यासारख्या हत्याराचा धाक दाखविला. "आम्हाला हप्ता न दिल्यास जिवे मारू,' असे म्हणत सचिन पवार यांच्या मानेवर हत्याराने वार केला; मात्र तो चुकविल्याने सचिन यांच्या दंडावर लागला. नंतर आरोपींनी कॅशिअर हनुमंत देशमुख यांना मारहाण करीत गल्ल्यातील 46 हजार 740 रुपये घेऊन पळ काढला. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The beaten and looted for refusing to pay the installment on the Solapur Nagar road