esakal | अपघाताने केली पोलखोल ः पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर विखुरले बीफ, वाहतूक ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

Beef scattered on Pune-Nashik National Highway

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातील गोवंशाचे कत्तलखाने बंद असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

अपघाताने केली पोलखोल ः पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर विखुरले बीफ, वाहतूक ठप्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातील गोवंशाचे कत्तलखाने बंद असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र आज सकाळी नऊच्या सुमारास, नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील, डोळासणे शिवारात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव वेगाने जाणारा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात, शेकडो किलो गोवंशाचे मांस रस्त्यावर विखुरल्याने पोलिसांचा दावा खोटा असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. या अपघातामुळे पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.

हेही वाचा - महिलांसाठी सरकारची विशेष गिफ्ट

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी नऊच्या सुमारास संगमनेरहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरुन पुण्याच्या दिशेने चाललेल्या मालट्रकला पाठीमागून आलेला पिकअप टेम्पो ( एमएच. 47 ई. 2760 ) ने पाठीमागून जोराची धडक दिली. धडकेनंतर रस्त्याच्या मध्यावर पिकअप उलटली. त्यातील दडवून ठेवलेले शेकडो किलो गोवंशाचे मांस रस्त्यावर विखुरले गेले. त्यामुळे घाबरलेल्या पीकअप वाहनाच्या चालकाने तेथून पळ काढला. याबाबत मालवाहक ट्रकच्या चालकाने महामार्ग पोलिसांना खबर दिली. मात्र तोपर्यंत पुण्याकडे जाणार्‍या लेनवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. महामार्गावर सर्वत्र गोवंशाचे मांस आणि बर्फाचे तुकडे पसरलेले असल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली होती.

महामार्ग पोलिसांनी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावरील गोवंश मांस गोळा करुन दरीतच खड्डा घेवून त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर पलटी झालेला टेम्पो बाजूला करण्यात आला. सुमारे तासाभरानंतर दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली. याबाबत घारगाव पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त टेम्पो ताब्यात घेतला आहे.

राज्यातील काही मोठ्या शहरांसह थेट कर्नाटकातील गुलबर्गापर्यंत गोवंशाचे मांस पुरविण्यात संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे. या अवैध व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने आजवर शेकडो वेळा कत्तलखान्यांवर कारवाया होवूनही ते पूर्णतः बंद होवू शकलेले नाहीत. अपघातग्रस्त वाहनातील गोवंशाचे मांस तेथीलच असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 

loading image