बेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो

शांताराम काळे
Sunday, 23 August 2020

बेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने एकूण ९४.५८ दशलक्ष घनफूट क्षमतेचा साठवण तलाव भरून वाहू लागला आहे.

अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील बेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने एकूण ९४.५८ दशलक्ष घनफूट क्षमतेचा साठवण तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे सरपंच जालिंदर फापाळे व ग्रामस्थांनी जलपुजन केले.

जलपूजन केल्यानंतर सरपंचांनी ग्रामस्थांना पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी सरपंचांसह शिवाजी फापाळे, बाबाजी फापाळे, भिमा फापाळे, पोलिस पाटील केशव त्रिभुवन, बाळासाहेब फापाळे, आप्पाजी फापाळे, प्रकाश फापाळे, के. डी. घबाडे, रामदास हांडे, बाळासाहेब फापाळे, रमेश पवार, हौशीराम गोपाळे, जयराम फापाळे, राजू कुऱ्हाडे, दिनकर फापाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा तलाव भरल्यामुळे कोटमारा धरणात नवीन पाण्याची आवक झपाट्याने सुरू झाली आहे. या पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील ब्राह्मणवाडा, जांभळे, काळेवाडी, बदगी तसेच लाभक्षेत्रातील बेलापूर, चैतन्यपूर, जाचकवाडी येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

माती साठवण तलाव या प्रकारात मोडणाऱ्या या प्रकल्पाची उंची १९.९३ मीटर व लांबी ५०७.०० मीटर आहे.१७.८० चौकिमीचे पाणलोटक्षेत्र आहे. ७७.८५ दशलक्ष घनफूट उपयुक्तसाठा तर १६.१३ मृतसाठ आहे. यंदाच्या उन्हाळ्यात देखील हे धरण कोरडे ठाक पडले होते. परिणामी बेलापूर व ब्राह्मणवाडा दोन्ही गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. तलाव भरल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belapur Badgi small scale irrigation project overflow in Akole taluka