Ahmednagar : ‘भारत जोडो’ यात्रा भाजपच्या फायद्याचीच ; वनमंत्री. मुनगंटीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forest Minister on Munganti

Ahmednagar : ‘भारत जोडो’ यात्रा भाजपच्या फायद्याचीच ; वनमंत्री. मुनगंटीवर

शिर्डी : खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जेथून गेली, त्या भागातील निवडणुकांत भाजपचे उमेदवार विजयी होतात. याचा अर्थ असा, की पंतप्रधान नरेंद्र मोदी देश जोडण्याचे काम करतात, हे जनता दाखवून देते आहे. भाजपचा विस्तार आणि फायद्यासाठी त्यांनी ही यात्रा काढली असावी, अशी मिस्कील टिप्पणी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

आज (बुधवारी) त्यांनी येथे येऊन साईसमाधीचे दर्शन घेतले. साईसंस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, डॉ. राजेंद्र पिपाडा, सचिन तांबे आणि विनोद संकलेचा हे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रात दोन राज्यमंत्रिपदे आणि दोन राज्यांचे राज्यपालपद दिले जाणार आहे का, असे विचारले असता त्यांनी, याबाबत मला काहीही माहिती नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे, याबाबत तुमच्यासारखाच अनभिज्ञ आहे, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी पुढील निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असेल, अशा केलेल्या भविष्यवाणीवर टीका केली. ते म्हणाले, की राऊत यांचे भाष्य ऐकले की मला ‘गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी... अन् म्हणायचा या जागेवर बांधीन माडी...’ची आठवण होते, असे सांगत अधिक भाष्य करणे टाळले.

भाजपची राज्यात सत्ता आली तेव्हापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, त्यांच्या पत्नी अमृता, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगवेगळी नावे देऊन विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख ज्या पद्धतीने करतात, ते पाहिले की फार वाईट वाटते. जे अधिक शिव्या देऊ शकतात, त्यांना प्रवक्ते नेमण्याची स्पर्धा सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलेली खंत योग्यच आहे. आता खासदार राऊत आणि सामना यांनाही तसेच वाटत असेल, तर आनंद आहे. चांगले निर्णय, चांगली कामे न दाखविता केवळ शिव्याशाप देणारे छोट्या पडद्यावर दाखविले जात असतील, तर स्तर कसा उंचावणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

वन खात्याच्या पडीक जमिनीवर कुणी वृक्षारोपण करणार असेल, तर त्यास तातडीने परवानगी देऊ. शिर्डीजवळील वन खात्याच्या ऐंशी एकर जमिनीवर येथील ग्रीन अँड क्लीन शिर्डी ही स्वयंसेवी संस्था वृक्षारोपण करू इच्छित असेल, तर आम्ही त्यांना लगेचच परवानगी देऊ.

- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री