
विरोधकांची भूमिकाही भाजपचीच काही मंडळी पार पाडत असताना, दुसरीकडे विरोधी राष्ट्रवादीचे नेते बघ्याची भूमिका घेत आहेत.
पाथर्डी : पालिकेत भाजपचीच सत्ता असताना, भारतीय जनता युवा मोर्चाचे मुकुंद गर्जे व माजी शहराध्यक्ष नागनाथ गर्जे यांच्या आंदोलनांमुळे या पक्षातील दुफळी समोर आली आहे. नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्याविरुद्ध गर्जे यांनीच उघड उघड बंड पुकारल्याने, भाजपमध्ये जुने (निष्ठावंत) व नवे (राजळे समर्थक) असा संघर्ष पेटला आहे.
पालिकेत विरोधकांची भूमिकाही भाजपचीच काही मंडळी पार पाडत असताना, दुसरीकडे विरोधी राष्ट्रवादीचे नेते बघ्याची भूमिका घेत आहेत.
भाजयुमोर्चाचे आंदोलन
भाजपयुमोचे मुकुंद गर्जे यांनी दोन महिन्यांपूर्वी पालिकेच्या कारभाराविरुद्ध कार्यालयासमोर उपोषण केले. त्या वेळी दिलेले आश्वासन पालिका पदाधिकाऱ्यांनी न पाळल्याने, दोन दिवसांपूर्वी भाजपचेच नागनाथ गर्जे यांनी पालिकेविरुद्ध अजंठा चौकात उपोषण केले.
हेही वाचा - माजी मंत्र्यांच्या मुलीची झाली एंगेजमेंट
भाजपमधीलच एका गटाने त्याचे जोरदार समर्थन केले. नगराध्यक्ष गर्जे यांच्याविरुद्ध चांगलीच भाषणबाजी झाली. नगराध्यक्ष गर्जे हे आमदार मोनिका राजळे यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे भाजपमधीलच दुसरा गट नगराध्यक्ष गर्जे यांच्या कारभारावर जाहीर टीका करीत आहे.
नागरी समस्यांचा बोजवारा उडाला असून, स्वच्छतेच्या निविदेमधील लाभार्थी कोण, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पालिकेत गर्जे विरुद्ध गर्जे हा सामना चांगलाच रंगला आहे. निवडणूक जवळ येत असल्याने वातावरण तापायला सुरवात झाली आहे.
पालिकेचा कारभार आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने सुरू आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना असतो. राज्यात भाजपची सत्ता नसल्याने विकासकामांच्या निधीवर मर्यादा आल्या आहेत. राजळे यांनी दिलेल्या निधीतून कामे सुरू आहेत.
- डॉ. मृत्युंजय गर्जे, नगराध्यक्ष, पाथर्डीपालिकेत सावळा गोंधळ सुरू आहे. रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी व वीज यांसाठी नागरिकांना आंदोलने करावी लागतात. कोटींचा निधी आला; मग विकास कुठे झाला? विकास जनतेचा झाला की पदाधिकाऱ्यांचा, हे समजत नाही. विकासकामे बंद पडली आहेत. ती सुरू करण्यासाठी आंदोलन केले.
- नागनाथ गर्जे, माजी शहराध्यक्ष, भाजप