कोरोनामुळे भीमा पट्टा अस्वस्थ 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

दौंड (जि. पुणे) येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने श्रीगोंद्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातच गार व निमगाव खलू ही दोन गावे बफर झोन झाल्याने तालुक्‍यातून दौंडकडे जाणारे सगळे रस्ते सील करण्यात आले आहेत.

श्रीगोंदे : दौंड (जि. पुणे) येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने श्रीगोंद्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातच गार व निमगाव खलू ही दोन गावे बफर झोन झाल्याने तालुक्‍यातून दौंडकडे जाणारे सगळे रस्ते सील करण्यात आले आहेत. नदीतून बोटींद्वारे प्रवास होत असल्याने तेथील बोटी हटविण्यात आल्या. 

दौंड येथे पहिला एक कोरोनाबाधित रुग्ण असतानाच राज्य राखीव पोलिस दलाचे आठ जवानही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. श्रीगोंद्यातील भीमा नदीकाठच्या बहुतेक गावांतील लोकांचा दौंडशी संपर्क असतो. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच गार व निमगाव खलू ही दोन गावे बफर झोनमध्ये येत असल्याचे प्रांताधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी स्पष्ट केल्याने प्रशासन अजूनच सतर्क झाले. 

आमदार बबनराव पाचपुते यांनी आज सकाळी गार, निमगाव खलू येथे जाऊन लोकांसह प्रशासनाशी चर्चा करून सूचना दिल्या. तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे उपस्थित होते 

तालुक्‍यातील डॉक्‍टरांना सूचना देण्यात आली आहे, की कुठलाही रुग्ण आता दौंड येथील रुग्णालयात "रेफर' करायचा नाही. गरज असेल, तर नगरला रुग्ण पाठवावेत. या गावांतील लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागातून दौंडला दूध घरपोच करणारे अनेक शेतकरी आहेत. त्या सगळ्यांना आता बंदी केली आहे. 
 

गार व निमगाव खलू येथील लोकांशी चर्चा केली. लोकांना आता बाहेर पडू नका आणि बाहेरील कोणी घरी येऊ देऊ नका, असे सांगितले आहे. लोकांनी शिस्त पाळली असून, प्रशासन चांगले काम करीत आहे. कोरोना संकट श्रीगोंद्यावर येऊ न देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. 
- आमदार बबनराव पाचपुते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhima belt uncomfortable due to corona