
अकोले येथील अगस्ती आश्रमात ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम मंदिराचा भूमिपुजन सोहळा होत आहे. यासाठी शंकरजी गायकर व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते तालुक्यातील पाच क्षेत्रातुन आणलेले जल व माती यांचे विधिवत पूजन करण्यात आले.
अकोले(नगर): श्रीराम हे सर्वांचे असून प्रत्येकाच्या मनात राम वसलेले आहे. भारत हा हिंदूंचा देश असून श्रीराम मंदिर उभारणीवर टीका होते. हे या देशाचे दुर्भाग्य आहे. महाराष्ट्राचे दिग्गज नेत्यांनी आपला स्वाभिमान गहान ठेवला आहे. त्यांची मती गेली आहे अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय महामंत्री शंकरजी गायकर यांनी केले.
अकोले येथील अगस्ती आश्रमात ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम मंदिराचा भूमिपुजन सोहळा होत आहे. यासाठी शंकरजी गायकर व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते तालुक्यातील पाच क्षेत्रातुन आणलेले जल व माती यांचे विधिवत पूजन करण्यात आले. हे जल व माती अयोध्या येथे राम मंदिर उभारणीसाठी नेण्यासाठी शंकरजी गायकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी श्री.गायकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.मनोहर महाराज भोर होते. यावेळी हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अड के.डी.धुमाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाजपचे जिप गटनेते जालिंदर वाकचौरे, विष्णू महाराज वाकचौरे, वसंत मनकर, गिरजाजी जाधव, यशवंत आभाळे, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, बाळासाहेब मुळे, प्राचार्य दीपक जोंधळे, प्रदीप भाटे, बाळासाहेब कोंढार, रमेश राक्षे, दिनेश शाह, लकी जाधव, डॉ.रवींद्र गोर्डे, राहुल ढोक, राहुल देशमुख, किरण महाराज शेटे, रामनाथ मुतडक आदींसह आर एस एसचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
श्री. गायकर पुढे म्हणाले की, श्रीराम मंदिराची उभारणी होणे म्हणजे देश आतंकवादयाच्या तावडीतून बाहेर येणे होय. देश भयमुक्त होणे होय. राम मंदिराचा इतिहास रक्ताने लिहिला गेला आहे. या मंदिर उभारणीसाठी अगस्ती ऋषी व प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील पावनभूमीतून जल व माती घेऊन जाणे हे माझे भाग्य आहे. रामजन्मभूमीचा इतिहास मोठा असून ती मुक्त करण्यासाठी ५०० वर्षे संघर्ष करावा लागला. लाखो कारसेवकांनी आपले बलिदान दिले आहे. रामाचे देशात अनेक मंदिरे आहेत, मात्र जन्मभूमी एकच आहे. इंडोनेशियामध्ये ९६ टक्के मुस्लिम असून त्यांची श्रद्धा श्रीरामावर आहे, त्यांनी अमेरिकेला सरस्वतीची संगमरवरी सहा फुटी मूर्ती भेट दिली आहे. कारण त्यांचे म्हणणे आहे की, आमची जात कोणतीही असली तरी आमची संस्कृती ही हिंदूं संस्कृती आहे.
जपानी लोक हिंदुपुढे नतमस्तक होतात. जिंदगी का नाम राम आहे, हिंदू धर्म टिकला पाहिजे. आज अनेकजण हिंदू समाजाला विरोध करतात. त्यांच्यावर हल्ले करतात ते हल्ले एका व्यक्तीवरचा नसून ते धर्मावर, गाथेवर व विचारावर व संतावर होणारे हल्ले आहेत. सर्वांनी यासाठी सावध झाले पाहिजे, असे असले तरी हिंदूधर्म सहजासहजी नष्ट होणार नाही याची जाणीव ठेवावी. राम हा आदी व अंत यांचा मिलाप आहे. राम मंदिर उभारणे ही छोटी संकल्पना नाही. या साठी मरावे लागले तरी कमीच आहे. सर्व धर्माचे मूळ हिंदू धर्मात आहे. सत्याचा आधारस्तंभ, दीपस्तंभ राम आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. अयोध्या हा माझा पुनर्जन्म आहे. जो पर्यंत प्राण आहे तो पर्यंत मी लढणार असल्याचे श्री गायकर यांनी सांगितले.
माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की, या तालुक्यात श्रीरामाच्या अनेक पाऊलखुणा आहेत. ५ ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराचा अयोध्या येथे भूमिपूजन होत असून तालुक्यातील अगस्ती आश्रम जेथे श्रीराम तीन वेळा सीता माता, लक्ष्मण, हनुमान व बिभीषण आले होते. श्रीराम प्रभू यांचे वंशज सत्वशील राजा हरिश्चंद्र याने गडावरील, सितामाईचे वास्तव्य असलेले कोदनी येथील त्या वाल्मिकी ऋषीच्या तातोबा आश्रमातील व जेथे श्रीरामाने जटायूला पाणी पाजले त्या सोमठाण्याच्या श्री क्षेत्र सोमेश्वर, तर अमृतेश्वर येथे उगम पावलेल्या अमृतवाहिनीचे प्रवरा मातेचे असे पाच क्षेत्राचे जल आणण्यात आले असून येथील माती व जल श्रीराम मंदिर उभारणीसाठी जाणे हे आपले सर्वांचे भाग्य आहे.
सध्या साधू संतांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. हे त्या व्यक्तीवरचे हल्ले नसून हिंदू धर्मावर व संस्कृतीवर होत असलेले हल्ले आहेत. असे कितीही संकटे आली तरी श्रीरामाच्या आशीर्वादाने सर्व संकटे दूर होतील. माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी 1992 मध्ये श्रीराम मंदिरासाठी एकेक वीट देण्यासाठी पुढाकार घेतला होता. 5 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोध्याला जाता येत नाही. त्यामुळे सर्व भारतीयांनी आपल्या घरावर गुढी उभारावी. असे आवाहन वैभवराव पिचड यांनी केले. श्री गायकर यांना अयोध्याला जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात हभप मनोहर महाराज म्हणाले की, जगाला मार्गदर्शक ठरणारे श्रीराम मंदिर उभे राहणे म्हणजे ज्यांनी बलिदान दिले त्यांना मिळालेले फळ होय. राम जन्मभूमी ही जरी अयोध्या असली तरी अगस्ती आश्रमात प्रभू रामचंद्रांना रावणाला मारण्यासाठी अगस्ती ऋषींनी बाण दिला, त्यांना मार्गदर्शन केले. राम वनवासात असताना रामायण येथे घडले. येथे रामायण लिहिले गेले. तालुक्याचे भूषण प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या पाठीशी संपूर्ण तालुका खंबीरपणे उभा आहे. स्वागत अँड के.डी.धुमाळ यांनी तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी आभार दीपक महाराज देशमुख यांनी मानले.
संपादक- सुस्मिता वडतिले