गाव सोडून मुंबईत गेलेलं ते कोट्यधीश कुटुंब परतलं...पण गावात घरदारच नाही, नि जमीनही विकलेली

The billionaire family who left the village and went to Mumbai returned
The billionaire family who left the village and went to Mumbai returned

नगर : पंचवीस-तीस वर्षांपूर्वी गाव सोडून मोठ्या शहरात गेलो. उद्योग-व्यवसाय जोरात सुरू होता. वर्षभरात कोटयवधीची कमाई होते.मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये फ्लॅट, बंगले आहेत. पण आता शहरात राहायाची इच्छाच राहिली नाही. शेजारी केव्हाच गावी गेलेत. गावचा जमीनजुमला, घरदार विकल्यामुळे आता पाय ठेवायला जागा नाही. तरीही गावखेड्यात चाललोय. शाळा, समाजमंदिर नाय तर एखाद्या पडक्या घरात राहू, पण शहरात रहायची इच्छा नाही. सर सलामत तो पगडी पचास... असं म्हणत मुंबईतील एका कुटुंबाने गावची वाट धरलीय. विशेष म्हणजे कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी सोडून जीव वाचविण्यासाठी ते गावात उतरले आहेत.

पुणे आणि मुंबई शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. ज्यांचे गावाकडे घर आहे, त्यांनी केव्हाच घरचा रस्ता धरला. जे अडकले होते, तेही परतू लागले आहेत. परंतु ज्यांना घर नाही त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. आठ दिवसांपासून शहरात राहणाऱया लोकांची गावाकडे जाण्यासाठी रिघ लागलीय. दोन दिवसापूर्वी अशाच एका कुटुंबाची ही कहाणी समोर आली.

कोट्यधीश चहालाही मोताद

मोठ्या प्रमाणात गावात लोक परतू लागल्याने जिल्ह्याच्या हद्दीत तपासणी नाके सुरू आहेत. बीड-नगर जिल्ह्याच्या सीमेवर दौला वडगाव येथे तपासणी नाका आहे. तेथे मुंबईतून आलेल्या एका वाहनाची पोलिसांनी तपासणी केली. चौकशीत त्या कुटूंबाला प्रवास करण्याची रितसर परवानगी होती. मात्र, त्यांच्या दोन लहान मुलांचे प्रवासाचे पास नव्हते. त्यामुळे पोलिस सोडायला तयार नव्हते. शेवटी विनंती केल्यावर माणुसकीच्या नात्याने पोलिसांनी त्यांना सोडून दिले. तेथे नाक्यावर कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी लोकांच्या जेवणाची, नाष्ट्याची सोय केली. प्रवास करणाऱया त्या कुटूुंबाला चहा, नाष्ट्याची सोय केली. अधिक चौकशी केल्यावर ते कुटूंब कोट्याधीश असल्याचे समोर आलं.

सगळं विकून गेलो होतो...

पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही गावाकडील सगळी प्राॅपर्टी विकून मुंबईला स्थायिक झालो. तिथं सुरू केलेला उद्योग भरभराटीला आला. कोट्यवधी रुपयाचा टर्नओव्हर आहे. महागड्या वस्तीत फ्लॅट. दोन महिन्यापूर्वी कोरोनाचे संकट आले आणि धीर खचत चालला. अपारमेंटमध्ये राहणारी पन्नास-साठ कुटूंब. सगळी आपापल्या गावी निघून गेली. आम्ही एकटे पडल्याने भीती वाटायला लागली. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय घेतला.

कुठंही राहू पण...

आम्ही धाडस करून गावाकडे निघालो आहोत. कारण आम्हाला गावी काहीच नाही. परंतु गावकऱ्यांच्या माणुसकीवर आम्हाला भरोसा आहे. कारण शहरात त्यांना अडचण आल्यावर आम्ही त्यांचे दुःख वाटून घेत आलोत. त्यामुळे दिलासा वाटतोय. गाडीत सगळे सामान आणलेय. गावात गेल्यावर गावकरी आधार देतीलच, तिथं गेल्यावर कुठंही राहू, शाळा, समाजमंदिर नाय तर एखाद्या पडक्या घरात राहू, पण सध्या शहरात रहायची इच्छा नाही, असे म्हणत दौला वडगावच्या नाक्यावर मिळालेला घोटभर चहाही त्यां कोट्यधीश कुटुंबाला लाखमोलाचा वाटला. डोळ्यातल्या अश्रूतून ते दिसत होतं. वाटेत त्यांना ना हॉटेल उघडं दिसलं ना चहाची टपरी.

गावच्या मातीचे प्रेम जपलेच पाहिजे....
कोणी कुठंही गेलं तरी गावची ओढ असलीच पाहिजे. गावच्या मातीशी आपलं नातं जन्मोजन्मीचे असते. त्याची जपणूक करत गावच्या मातीवर प्रेम केलंच पाहिजे. गावात गेल्यावर किमान तिथं दोन दिवस आनंदाने राहता येईल एवढी तरी जागा असलीच पाहिजे. आता कोरोनाच्या संकटात याची अनेकांना जाणीव होताना दिसत आहे. कारण गावाने अजूनही माणुसकी मारलेली नाही. 
- कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे, आदर्श शेतकरी, 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com