esakal | नगरला कोरोनाचा खरा धोका पंधरा दिवसांनंतर

बोलून बातमी शोधा

The real threat of corona to Ahmednagar after fifteen days

नगरच्या शेजारील पुणे व औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक अशा चोहोबाजूने  कोरोनाने हातपाय पसरले आहेत. तेथे सध्या गुणाकार सुरू आहे. आपल्याकडे रूग्णांची रांग लागली असताना इतर शहरात तुरळक किंवा बाधित नव्हते. आता तेथे स्थिती उलटी आहे. नगरमधील परिस्थिती आटोक्यात आणली असली तरी पुढील पंधरा दिवसांनंतर नगरला खरा धोका आहे.

नगरला कोरोनाचा खरा धोका पंधरा दिवसांनंतर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. नगर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाने पहिल्याच टप्प्यात घुसखोरी केली होती. काही ठिकाणी दुबईहून, तर काहींना तबलिगींच्या संपर्कामुळे कोरोनाची लागण झाली होती. कोरोना आढळल्याने सर्वच धास्तावले होते. मुंबई, पुण्यानंतर नगरमध्ये रूग्ण आढळत होेते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतल्याने जिल्ह्यात कोरोनाची वजाबाकी सुरू आहे. 

नगरच्या शेजारील पुणे व औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक अशा चोहोबाजूने  कोरोनाने हातपाय पसरले आहेत. तेथे सध्या गुणाकार सुरू आहे. आपल्याकडे रूग्णांची रांग लागली असताना इतर शहरात तुरळक किंवा बाधित नव्हते. आता तेथे स्थिती उलटी आहे. नगरमधील परिस्थिती आटोक्यात आणली असली तरी पुढील पंधरा दिवसांनंतर नगरला खरा धोका आहे.

चोहोबाजूने कोरोनाचा वेढा

पुणे ३ हजार, तर औरंगाबाद ८००, सोलापूर ४०० झाले आहे. शेजारील नाशिकचीही आकडेवारी मोठी आहे. या सर्वच भागातून  नगरमध्ये वाहतूक सुरू आहे. कोणी मामाकडे येत आहे कोणी सासरवाडीचा आधार घेत आहेत. जिल्ह्यातील नेवासे, पाथर्डी, शेवगाव, नगर तालुका आदी ठिकाणच्या लोकांचे औरंगाबादशी या ना त्या कारणाने संपर्क आहे. 

हेही वाचा - पारनेरच्या तहसीलदारबाईंना कर्मचारी वैतागले

या तालुक्यांनी रहावे सावध

गावागावांत ग्रामसुरक्षा दल कार्यरत आहेत. काही गावांमध्ये त्यांचा विशेष प्रभाव नाही, तर काही ठिकाणी मात्र बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. विशेषतः पुणे व औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमांवरील गावांनी विशेष सतर्कता बाळगायला हवी. नेवासे, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, पारनेर, श्रीगोंदे, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर आदी तालुक्‍यांना दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा आहेत. तेथे मोठा धोका आहे. महामार्ग सोडून आडवाटेने लोकं प्रवास करीत आहेत. वस्तीसाठी रहात आहेत.

लॉकडाउन हटले म्हणजे कोरोना संपला असे नव्हे

सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू आहे. नगर शहर मागील आठवड्यात कोरोनामुक्त झाले होते. सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्णांना बरे होऊन पाठवण्यात नगर राज्यात अव्वल आहे. येथे मृत्यूचे प्रमाण कमी आहे. आणि नव्याने लागण होण्याचे प्रमाण कमीच आहे. परंतु मागील आठवड्यात पुन्हा नगरकरांचे टेन्शन वाढले. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनीही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी सारसनगरमधील ड्रायव्हर आणि पाथर्डीतील शेतकऱ्याचे उदाहरण पुरेसे आहे. 

३१ मे नंतर लॉकडाउन हटले तर पुन्हा पुणे-मुंबईकडील लोकांचा गावाकडे अोघ वाढेल. आपला गाववाला आणि मित्र, नातेवाईक असे म्हणून त्यांच्याकडे कानाडोळा केला जात आहे. त्यांना क्वारंटाइन केल्याशिवाय गावात प्रवेश देऊ नये. लॉकडाउन हटले म्हणजे कोरोना संपला असे होणार नाही. एकमेकांच्या संपर्कात आल्याने बाधा होण्याची शक्यता त्या काळात अधिक आहे. त्यामुळे नगरला खरा धोका पंधरा दिवसानंतरच आहे. लॉकडाउन हटल्यानंतरही एकमेकांच्या संपर्कात न येणेच आपल्या हिताचे ठरणार आहे.