esakal | दार उघडा उद्धवा.. दार उघडाच्या घोषणांत भाजपचा 'घंटानाद'
sakal

बोलून बातमी शोधा

BJP agitation to open temples in Nevasa taluka

दार उघडा उद्धवा... दार उघडा... मंदिरे उघडाच्या व महाआघाडीच्याविरोधात घोषणा देत शनिवारी (ता. २९) सकाळी नेवासे भाजपच्या वतीने शहरासह तालुक्यातील विविध मंदिरांसमोर 'घंटानाद' आंदोलन करण्यात आले.

दार उघडा उद्धवा.. दार उघडाच्या घोषणांत भाजपचा 'घंटानाद'

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) :दार उघडा उद्धवा... दार उघडा... मंदिरे उघडाच्या व महाआघाडीच्याविरोधात घोषणा देत शनिवारी (ता. २९) सकाळी नेवासे भाजपच्या वतीने शहरासह तालुक्यातील विविध मंदिरांसमोर 'घंटानाद' आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करावी. या मागणीसाठी आध्यात्मिक आघाडीच्या आयोजित केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नेवासे तालुका भाजपच्या वतीने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली शनिशिंगणापूर येथे तर नेवासे भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखाली नेवासे शहरातील खोलेश्वर गणपती मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, मोहिनीराज मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आहे.

बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मंदिरे बंद असणे हा भाविकांवरील अन्यायच आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन उठले असून देखील तीर्थक्षेत्रे व मंदिरे बंद आहे मंदिराचे दारे या सरकारने खुले करावे, भजन प्रवचनाला परवानगी मिळावी म्हणून हे आंदोलन असून सरकारने याबाबत गांभीर्याने घ्यावे.

मनोज पारखे म्हणाले, राज्यात सर्वच व्यवसाय सुरू करण्याचे निर्णय सरकारने घेतले. मात्र मंदिर उघडण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय पाच महिन्यांपासून बंद असल्याने आर्थिक अडचणीत आले आहेत.

आंदोलनात निरंजन डहाळे, नगरसेवक सुनील वाघ, अजित नारूला, प्रशांत बहिरट, सचिन नागपुरे, विवेकानंद नन्नवरे, महेश लबडे, राजेश कडू, मनोज डहाळे आदी सहभागी झाले होते.

नेवासे तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या नेतृत्वाखाली नेवाशात पोलिस निरीक्षक रणजित डेरे, सोनई येथे साहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे व शनिशिंगणापूर येथे पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

साठ ठिकाणी 'घंटानाद' : नितीन दिनकर
नेवासे तालुक्यात साठ ठिकाणी मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन झाल्याचे दावा नेवासे तालुका भाजपचे अध्यक्ष नितीन दिनकर यांनी केला असून आघाडी सरकारने मद्यालयांना परवानगी दिली मात्र देवालयांना नाही. त्यामुळे अनेक कीर्तनकार घरी बसून आहे तर देवालयांसमोर उपजीविका करणारे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर