esakal | मोदींनी पैसे छापण्याचे मशिन आणले काय? सभेत पक्षप्रतोदांचा बोलताना गेला तोल
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

सभेत पक्षप्रतोदांचा बोलताना गेला तोल! भाजप सदस्य आक्रमक

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे पक्षप्रतोद अजय फटांगरे यांचा बोलताना तोल गेल्याने सभेत गोंधळ झाला. भाजपच्या सदस्यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रुग्णवाहिका खरेदीच्या विषयावर चर्चा सुरू होती. त्यावर बोलताना भाजपचे पक्षप्रतोद जालिंदर वाकचौरे म्हणाले, की चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे केंद्राचे आहेत. ते ज्या कामासाठी आलेले आहेत, त्यावरच खर्च करा. याच वेळी बोलण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय फटांगरे उठले. अन्....

जिल्हा परिषद सभा - भाजपचे सदस्य आक्रमक

त्यांनी वाकचौरे यांना, सारखे केंद्राचे पैसे आहेत, असे काय सांगता? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय पैसे छापण्याचे मशिन आणले काय, असे म्हणताच सभेत एकच गदारोळ सुरू झाला. यावर जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी आक्षेप घेत, हे बोलणे चुकीचे आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. सभागृहात असे बोलणे चुकीचे आहे, असे सांगून फटांगरे यांच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावर जिल्हा परिषद सदस्य पंचशिला गिरमकर यांनीही आक्षेप घेतला. यावरून गदारोळ सुरू असतानाच जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समिती सभापती सुनील गडाख यांनी हस्तक्षेप करीत, फटांगरे यांच्याकडून चुकून शब्द गेलेला आहे. हे चुकीचे आहे; त्याबद्दल ते दिलगिरीही व्यक्त करीत आहेत. यापुढे सभेत असा प्रकार पुन्हा होऊ नये, असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर पडदा पाडला.

त्या कामाची चौकशी होणार

जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा बोधेगाव येथे असताना शाळेच्या खोल्यांचे दुसरीकडे काम कसे सुरू आहे, असा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी उपस्थित केला. हे काम तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी केली. यावर, चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी शिक्षण विभागाला दिली.

हेही वाचा: लेकीला संपवून संसार मोडला; 'त्या' घटनेने केडगाव हादरले!

लिफ्ट अन् कामे मंजुरीवर ‘बांधकाम' धारेवर

जिल्हा परिषदेच्या लिफ्टच्या कामावरून व बांधकाम विभागातर्फे कामांना मंजुरी देण्याच्या मुद्द्यावर राजेश परजणे यांनी बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर धरले. कामे मंजूर करण्यासाठी नेमका अवधी का लागतो, असा सवाल त्यांनी या वेळी केला. या वेळी सभापती काशिनाथ दाते यांनी, लिफ्टचे काम आधी सेस फंडातून करण्यात येणार होते. मात्र, त्यात बदल करून घसारा निधीतून करण्यात आले. त्यामुळे त्याला उशीर झाल्याचे सांगितले. सध्या लिफ्ट सुरू आहे. तसेच, यापुढे बांधकाम विभागाने कामांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी सूचना सभापती दाते यांनी केली.

हेही वाचा: पूल कोसळल्याने दोन गावांचा संपर्क तुटला

loading image
go to top