भाजप आमदार पाचपुतेंचा श्रीगोंदा तालु्का महाविकास आघाडीकडे

संजय आ. काटे
Tuesday, 19 January 2021

भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचा वांगदरीत, तर माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडीक यांचा वडघुल- खांडगाव ग्रामपंचायतीत पराभव झाला.

श्रीगोंदे : तालुक्‍यातील 58 ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. सध्याचे राजकीय चित्र संमिश्र दिसत असले, तरी राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व अधोरेखित होते. तालुक्यात भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. तरीही महाविकास आघाडीने येथे बाजी मारल्याचे दिसते.

ढवळगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. शिवाय, काही ठिकाणच्या जागा बिनविरोध झाल्या असल्या, तरी 58 ग्रामपंचायतींच्या 566 जागांचा निकाल आज जाहीर झाला. त्यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल वीर यांचा येळपणे येथे पराभव झाला. त्यांच्या मुलालाही पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा - वांगदरी बापू कुटुंबाच्याच मागे

भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचा वांगदरीत, तर माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडीक यांचा वडघुल- खांडगाव ग्रामपंचायतीत पराभव झाला. जेजुरी येथील पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या पत्नीचा उक्कडगावात पराभव झाला. 

वांगदरीत कॉंग्रेस नेते अनुराधा नागवडे यांनी सत्ता राखली. पाचपुते गटाचा तेथे 12 विरुद्ध 1 असा पराभव झाला. वडाळीत राष्ट्रवादीचे नेते घनश्‍याम शेलार यांनी बाजी मारली.

उक्कडगावात पाचपुते गटाच्या हातून सत्ता गेली. आढळगावात संमिश्र निकाल लागला, तरीही उत्तम राऊत यांच्या जास्त जागा आल्या. तेथे अनुराधा ठवाळ यांचा विजय झाला. मात्र, त्यांचा मुलगा श्रीकांत याचा बंटी उबाळे यांनी सलग दुसऱ्यांदा पराभव केला. हिरडगावात आघाडीने बाजी मारली. अंबादास दरेकर व प्रशांत दरेकर यांनी प्रा. तुकाराम दरेकर व मिलिंद दरेकर यांच्या गटाचा पराभव केला. 

कौठे येथे शाहूराजे शिपलकर व नितीन थोरात यांच्या गटाने पाचपुते गटाचा पराभव केला. येळपणे येथे पाचपुते गटाच्या सतीश धावडे यांनी जगताप गटाचा पराभव केला. भानगावात सुरेश गोरे यांच्या गटाने सत्ता आणली. निमगाव खलू येथे पाचपुते गटाने बाजी मारली. हिंगणीत जिल्हा परिषद सदस्य कोमल वाखारे यांच्या गटाचा पराभव झाला. चिंभळ्यात नागवडे-जगताप गटाने बहुमत मिळविले. 

बाबुर्डी, एरंडोलीत समसमान मते 
बाबुर्डी येथील पांडुरंग शिर्के व सुहास शिर्के यांना मतदान यंत्रासह टपाली मतदानातही समान मते मिळाली. चिठ्ठीत पांडुरंग शिर्के यांना नशिबाने साथ दिली. एरंडोलीत मच्छिंद्र इथापे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Pachpute's Shrigonda taluka to Mahavikas Aghadi